रेल्वे स्थानकांवरील कोरोना चाचणीची जबाबदारी खासगी प्रयोगशाळांकडे

0
86

रेल्वेद्वारे परराज्यांतून गोव्यात दाखल होणार्‍या लोकांची रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी करण्याचे काम खासगी रोगनिदान प्रयोगशाळांकडे सोपवणार असून, त्याबाबत काही रोगनिदान प्रयोगशाळांशी चर्चा सुरू असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. दरम्यान, सध्या राज्यातील काही स्थानकांवर सरकारकडून कोरोना चाचणी केली जात आहे.

राज्यातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर कोरोना चाचणी सुविधा सुरू करण्यात येणार आहे व त्यासाठी काही खाजगी रोगनिदान प्रयोगशाळांकडे चर्चा करण्याबरोबरच त्याविषयीची अन्य तयारीही केली जात असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

ज्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्याच पर्यटकांना राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. जुलै अखेरपर्यंत राज्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या १०० टक्क्यांवर पोहोचणार असल्याचा विश्‍वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारने संचारबंदीचा कालावधी १२ जुलैपर्यंत वाढवलेला असून, आता मद्यालये व रेस्टॉरंट्सना ५० टक्के आसन क्षमतेसह सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. तसेच कालपासून राज्यातील केशकर्तनालये देखील खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तिथे ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.

राज्य सरकार घेणार लसीकरणाचा आढावा
राज्यभरातील ग्रामपंचायत क्षेत्रातील किती लोकांचे अद्याप कोविड प्रतिबंधक लसीकरण होणे बाकी आहे, त्याचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. या सर्वेक्षणातून किती लोकांचे लसीकरण होणे बाकी आहे, त्याचा नेमका आकडा सरकारला उपलब्ध होणार आहे. तसेच राज्य सरकार लवकरच टीका उत्सवाची आणखी एक फेरी सुरू करणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.