सक्रिय कोरोनाबाधित २ हजारांच्या खाली

0
93

>> नव्या केवळ १३० रुग्णांची नोंद; कोरोनाने दोघांचा बळी

गेल्या चोवीस तासांत राज्यात नवीन १३० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, आणखी २ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारांच्या खाली असून, राज्यात सध्या १ हजार ९३४ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. जवळपास तीन महिन्यांनंतर सक्रिय कोरोना रुग्णसंख्या दोन हजारांच्या खाली आली आहे.

राज्यात कोरोना बळीच्या संख्येत घट होत असून, सक्रिय रुग्ण देखील कमी झाले आहेत. यापूर्वी ३ एप्रिल रोजी राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या दोन हजारांच्या (१९८०) खाली आली होती. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट टिपेला पोहोचल्यानंतर राज्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत चालली होती.

गेल्या चोवीस तासांत केवळ २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण बळींची संख्या ३,०७५ एवढी झाली आहे.

चोवीस तासांत १३० नवे रुग्ण
गेल्या चोवीस तासांत केवळ ३९७९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील केवळ १३० नमुने बाधित आढळून आले आहेत. चोवीस तासांत इस्पितळांमधून १२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६७ हजार ५६६ एवढी झाली आहे.


कुठ्ठाळीत सर्वाधिक रुग्ण
राज्याच्या विविध भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कुठ्ठाळी येथे सर्वाधिक १०९ सक्रिय रुग्ण, तर फोंडा येथे १०८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मडगावातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १००च्या खाली आली असून, ती ९७ एवढी झाली आहे. पणजीत केवळ ६५ सक्रिय कोरोनाबाधित आहेत.

२४ तासांत १६ जण इस्पितळांत
राज्यातील इस्पितळांत दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. चोवीस तासांत नव्या १६ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहे.

२८१ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल आणखी २८१ रुग्ण बरे झाले. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६२ हजार ५५७ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०१ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन १४४ रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.