शिवोली येथे भरधाव थार जीपची दुचाकीला धडक; 10 वर्षीय मुलगा गंभीर जखमी
शिर्ली मडगाव येथे रेंट-अ-कार (थार जीप) चालकाने चुकीच्या पद्धतीने वाहन चालवून एका दुचाकीचालक महिलेला गंभीर जखमी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, शुक्रवारी शिवोली येथे अशाच प्रकारे रेंट-अ-कार (थार जीप) चालकाने मद्याच्या नशेत बेशिस्तपणे वाहन चालवत एका दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 32 वर्षीय तरुण जागीच ठार झाला, तर 10 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी रेंट-अ-कार चालकाला हणजूण पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फर्नांडिसवाडा-शिवोली येथे शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला. त्यात दुचाकीचालक संकेत दाभोलकर (32, रा. दांडा-शिवोली) हा जागीच ठार झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला निश्चल मोरजकर (10) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जीप चालवणारा परप्रांतीय चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि बेफाम वेगाने वाहन चालवत होता. दरम्यान, या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी हणजूण पोलीस स्थानकावर धडक देत दोषी चालकावर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
पर्यटनमंत्री काय म्हणाले?
रेंट-अ-कार चालकांकडून बेशिस्तपणे वाहने चालवली जात आहेत. या प्रकरणामध्ये वेळीच हस्तक्षेप करून तोडगा काढण्याची गरज आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.
कठोर कारवाईची गरज : आलेमाव
आणखी जीवितहानी होण्यापूर्वी बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
दामू नाईक काय म्हणाले?
रेंट-अ-कार ही सेवा पर्यटकांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली आहे. रेसिंग किंवा बेदरकारपणे वाहने चालवण्यासाठी नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.