कला अकादमीत कार्यक्रमाचे आयोजन; उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती
कांपाल-पणजी येथील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात आज (दि. 30) सकाळी 9.30 वाजता 40 वा गोवा घटक राज्य दिन सोहळा विविध कार्यक्रमांसह साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उपस्थित राहणार आहेत. तसेच, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमानिमित्त गेल्या चार दशकांतील गोव्याचा वारसा, विकासाचा प्रवास दर्शविणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पद्मविभूषण मारियो मिरांडा प्रदर्शनाचे उद्घाटन, प्रसिद्ध गोमंतकीय व्यंगचित्रकार मारियो मिरांडा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मारियो मिरांडा स्मारक टपाल तिकीट आणि विशेष कव्हरचे प्रकाशन, ‘गोवा : इंजिनिअरिंग द नेक्स्ट इरा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आणि गोव्याचा केंद्रशासित प्रदेशातून राज्याचा दर्जा मिळण्यापर्यंतचा प्रवास दर्शविणारे विशेष प्रदर्शन ही या कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे आहेत.
या सोहळ्यात राज्यभरात आत्मनिर्भर समुदाय उभारण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्ती, स्वयंपूर्ण गावे आणि स्वयंपूर्ण मित्रांनी दिलेल्या योगदानाचाही गौरव केला जाईल. या प्रसंगी अनेक महत्त्वाचे उपक्रम आणि सन्मानही प्रदान केले जातील.
गोवा पोलीस खात्यांतील नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांना नियुक्तीपत्रांचे वितरण, दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेअंतर्गत वाढीव सहाय्याचा शुभारंभ, आणि दुग्धव्यवसाय व दुध उत्पादनातील उत्कृष्ट योगदानाबद्दल गोपाल रत्न पुरस्कार योजनेंतर्गत सत्कार यांचा समावेश आहे.
उपराष्ट्रपतींचे गोव्यात आगमन
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे गोवा भेटीवर काल संध्याकाळी आगमन झाले. दाबोळी येथे आयएनएस हंसा तळावर राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार कृष्णा साळकर यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी उपराष्ट्रपतींना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू व इतरांची उपस्थिती होती.