रुपयाचं मोल…

0
119
  • अंजली आमोणकर

आता कशालाही उपयोगी न पडणारं एका रुपयाचं नाणं आयुष्यात मला अनेक वेळा धडे शिकवत गेलंय. प्रत्येक वेळेला त्याचं बहुमोलत्व पटत गेलंय. त्या-त्या वेळी ते-ते जाणवलं नाही; पण आता अर्धंअधिक आयुष्य उलटून गेल्यावर जेव्हा वळून मागे बघते तेव्हा ते जाणवतं!

नोकरी करायला लागलेल्या व्यक्तीनं ही मजा करायची नाही…? ‘अरे, आता पैसे साठवशील तर लग्न-संसार नीट होईल.’ पुढे नव्या नवलाईचे नवरा-बायको असले तरीही… ‘‘पुरे, भविष्याकरिता साचवा थोडं… पुढे ढीगभर वय पडलंय मजा मारायला…’’ असं करता करता- कधी संसाराकरिता, कधी मुलांकरिता, कधी परिस्थितीपायी आवडीनिवडींची तडजोड करता करता त्यातली ‘मजा’ पतंगासारखी आकाशात उंच उडून जाते व कधी कटून धाराशायी होते कळतच नाही. वय काय, दिवसांगणिक वाढतच असतं. अन् ‘शोभतं का हे या वयात’- हे पार्श्‍वसंगीतही. त्या व्यक्ती धन्य, ज्यांना याकडे दुर्लक्ष करणं जमतं. त्या मनापासून सुखी होतात. कारण कधीही हाती न येणारं व सतत पळून जाणारं हे ‘एन्जॉयमेंट वय’ त्यांनी बरोबर मुठीत धरलेलं असतं. त्यांना तृप्तता व समाधानाचे अर्थ सांगावे-शिकवावे लागत नाहीत. त्यांना ते आपसुक कळलेले असतात. सुखी जीवनाची हीच गुरुकिल्ली आहे. प्रत्येक गोष्टीत रस घ्यायचा, आनंद शोधायचा व समाधानी राहायचं. तरुण पिढीतल्या व्यक्ती अमुक अमुक गोष्टी करत आहेत, आम्हाला कुठं मिळालं करायला अशी असमाधानी वृत्तीच सर्व आजारांचा पाया आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. इच्छा ताजीतवानी असेल तर खुशाल ‘एन्जॉय’ करा. कोण काय म्हणेल त्याकडे लक्षच द्यायचं नाही. आता कोणाला कशात मजा वाटते व कोणाला कशात नाही या विचार करण्याच्या गोष्टी आहेत.

आता कशालाही उपयोगी न पडणारं एका रुपयाचं नाणं आयुष्यात मला अनेक वेळा धडे शिकवत गेलंय. प्रत्येक वेळेला त्याचं बहुमोलत्व पटत गेलंय. त्या-त्या वेळी ते-ते जाणवलं नाही; पण आता अर्धंअधिक आयुष्य उलटून गेल्यावर जेव्हा वळून मागे बघते तेव्हा ते जाणवतं!
लहानपणी पाचसहा वर्षांची असताना मी मोठ्या हौसेनं लाल रंगाचा, वर काळं डिझाइन असलेला पत्र्याचा एक छोटा डबा मिळवला होता. वडिलांकडून त्याच्या झाकणावर एक खाच करून घेतली होती. आता तो माझा ‘मिलेर’ होता. ही पिग्गी बँक माझ्या एकटीच्या मालकीची होती. खाऊला मिळालेले पैसे मी त्यात साठवत असे. त्याकाळी दिल्लीत इतकी स्वस्ताई होती (व लोकांचे पगारही इतके कमी असायचे) की खाऊला मिळालेले पाच पैसे तुडूंब पुरून उरायचे. इतर सर्वजण खाऊ खात असताना मी मात्र पैसे मिलरात घालून बाहेर खेळायला पळायची. परत-परत आईकडून वदवून घ्यायची- ‘‘आई, हे पैसे माझ्या खाऊचे म्हणजेच माझ्या मालकीचे ना ग? मी ते कधीही खर्च करू शकते, हो ना?’’ आईपण ‘हो-हो’ करायची. सुट्‌ट्यांमध्ये आजी-आजोबा राहायला आले. तोपर्यंत ती सर्व चिल्लर जवळपास एका रुपयाची झाली होती. डबा पाऊण भरला होता. आणि अचानक एक दिवस आजी-आजोबांचे लाड करण्याचा मला झटका आला. (कारण घरातल्या इतर मुलांकडे पैसेच उरले नव्हते ते कुठून लाड करणार!) मी सर्वांच्यात शेखीपण मिरवणार होते. कुठेतरी माझा ‘अहं’ तृप्त होणार होता. गल्लीत येणार्‍या प्रत्येक फेरीवाल्याला मी थांबवत सुटले व आजी-आजोबांकरिता खाद्यपदार्थ घेत सुटले. ती दोघंही गोंधळली. त्यांनी लगेच आईला- ‘पोरगी कोणते पैसे खर्च करतेय?’ म्हणून विचारलं. आईनं तावातावानं येऊन माझा मिलर हिसकावून घेतला व खूप रागावली. ‘ही असली नाटकं करायला रुपया साठवलास का?’ म्हणाली. मला कळेचना. ‘माझ्या मालकीचा रुपया, मी खाऊ न खाता साठवलेला- तो मी आता खाऊवरच खर्च करतेय तर हिला चिडायला काय झालं?’ मी रडत रडत विचारलं. मी सगळ्यांबरोबर खाऊ खाल्ला असता तर खर्चच होणार होता ना? घरातल्या मोठ्यांना न विचारता परस्पर खर्च करायची वाईट सवय लागू नये म्हणून तो रुपया त्या डब्यासकट शेवटी आईने जप्त केला. माझं काळीज तेव्हा शतशः विदीर्ण झालं. मी इतकी रडले- इतकी रडले की मला फणफणून ताप भरला. शेवटी घाबरून आजीनं तिला तो डबा मला परत द्यायला लावला. पण आता त्या रुपयाची किंमत माझ्या लेखी शून्य झाली होती. कारण माझ्या मालकीहक्कावरच ती गदा होती. तो रुपया मला चटका लावून गेला.

मोठेपणी शिक्षिकेची नोकरी करताना परत एकदा रुपया भेटीला आला. तेव्हादेखील रुपयाला खूप मोल होते. बसचं तिकिट एक रुपया असायचं. विद्यार्थ्यांपैकी एकजण एका शिष्यवृत्तीच्या परीक्षेला जायला केवळ तिकिटाचे पैसे नाहीत म्हणून मागे राहणार होता. मी माझ्याकडचं एकुलतं एक नाणं पटकन त्याला देऊन बसमध्ये ढकललं. नंतर मी हे विसरूनही गेले. नंतर नोकरीही बदलली. लग्न झालं. अनेक वर्षांनंतर तो विद्यार्थी पत्ता शोधत घरी आला. आता तो मोठा इंजिनिअर झाला होता. सरकारी नोकरीत मानाच्या पदावर होता. ‘टीचर, त्या रुपयापायी मी परीक्षेला पोचलो, शिष्यवृत्ती मिळाली… आता हे दिवस पाहतोय…’ त्याला व मला दोघांनाही भरून आलं. हलाखीच्या परिस्थितीतून वेळेवर मिळालेला केवळ एक रुपयासुद्धा तुम्हाला वर काढू शकतो हा धडा नंतर मी शिकले.
अनेकदा केवळ रुपया कमी पडतो म्हणून माझे अनेक सौदे फिसकटलेले आहेत. कारण दुकानदार पैसे परत करताना ‘मोड नाही’ म्हणून रुपयाच्या जागी चॉकलेट देतात. पण रुपया नाही म्हणून गिर्‍हाईकाने चॉकलेट देलं तर ते स्वीकारणार नाहीत. आता तर तो रुपयाच दिसेनासा झालाय. त्याला मोलही उरलेलं नाही. पण माझ्या मनात मात्र त्याचं मोल करोड रुपयांचं आहे.