राष्ट्रपतींची आयएनएस हंसा तळाच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमास उपस्थिती

0
35

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ५ सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. राष्ट्रपती दि. ७ सप्टेंबरपर्यंत गोव्यात असतील. नौदलाच्या आयएनएस हंसा या तळाच्या हीरक महोत्सवानिमित्त होणार असलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रपती हजर राहणार आहेत. हा कार्यक्रम ६ सप्टेंबर रोजी होणार आहे, असे माहिती व प्रसिद्धी खात्याने कळविले आहे.

आपल्या गोवा भेटीत राष्ट्रपतींचा मुक्काम दोनापावला येथील राजभवनावर असेल. त्यामुळे जीर्ण झालेल्या राजभवनच्या इमारतीला नवी झळाळी देण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. राष्ट्रपतींचा सेवक वर्ग जेथे राहणार आहे त्या वास्तूचीही डागडुजी केली जात आहे.

गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गोव्यात आले होते. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्यावेळी व्यासपीठावरील विजेच्या एका बल्बचा स्फोट झाल्याने तारांबळ उडाली होती.

दरम्यान, राष्ट्रपतींच्या गोवा दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर काल गोवा राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांची राजभवनावर बैठक घेऊन दौर्‍याचा व सुरक्षेचा आढावा घेतला.