Home Featured रावणफोंड येथील अपघातात कारचालक जागीच ठार

रावणफोंड येथील अपघातात कारचालक जागीच ठार

0

काल मंगळवारी सकाळी रावणफोंड येथील मिलिटरी कॅम्पच्या पहिल्या फाटकानजीक मारुती अर्टिगा कारने (जीए ०८ आर ४३४०) वीज खांबाला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीची मोडतोड होऊन चालक व्हेरोना जॉन लुईस फर्नांडिस (४९) हा खलाशी जागीच ठार झाला तर त्यांची पत्नी व मुलगा जखमी झाला. या अपघातात लाखो रुपयांची हानी झाली.

व्हेरोना फर्नांडिस हे आपली पत्नी ऍड. व्हेनिया फर्नांडिस (४५), मुलगा देवर (१०) व भाऊ व्हेनासियो फर्नांडिस (५५) यांच्यासह कारने मडगाव येथून केपेच्या दिशेने भर वेगाने निघाले होते. सकाळी ८.३० वा. त्यांनी मिलिटरी कॅम्पजवळ प्रथम एक रिक्षाला जोरदार ठोकर दिली. त्यात रिक्षाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर रस्त्यालगत उभ्या असलेल्या तीन स्कूटरना धडक दिली. त्यात तिन्ही स्कूटरची मोडतोड झाली. त्यामुळे व्हेरोना यांचा कारवरील ताबा गेला आणि कारने रस्त्यालगत असलेल्या वीज खांबाला जोरदार धडक बसली. यामुळे वीज खांबही मोडून पडला. त्यानंतर कार जवळच्या स्वीटमार्ट दुकानात घुसली. त्यात कार पूर्णपणे चेंगरून गेली व गाडीत चिरडून चालक व्हेरोना यांचा मृत्यू झाला. त्यांना स्थानिकांनी व पोलिसांनी कारचे दार कापून बाहेर काढले. इतर तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना इस्पितळात दाखल केले आहे.