मांडवीच्या पुलावरून उडी घेतलेल्या दोघांना वाचवले

0
108

काल मंगळवारी सकाळी येथील मांडवी पुलावरून नदीत उडी घेतलेल्या एका पुरुष व एका महिलेला मच्छीमारांनी प्रसंगावधान राखून वाचवले. सदर महिला ही परप्रांतीय असून आपल्या पतीबरोबर झालेल्या भांडणामुळे तिने नदीत उडी घेतली. त्यानंतर तिला वाचवण्यासाठी तिच्या शेजार्‍याने तिच्या मागोमाग नदीत उडी घेतली. यावेळी नदीतून मासेमारीसाठी जाणार्‍या काही मच्छीमारांनी या दोघांनाही वाचवून नदीकिनारी आणले. त्यानंतर पोलिसांना कळवल्यानंतर त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

सदर महिलेचा पती हा कळंगुटला गेला होता. त्याला शोधत ती शेजार्‍याच्या दुचाकीवरून कळंगुटला निघाली होती. मांडवी पुलावर पोहोचताच तिने दुचाकी थांबवायला सांगून नदीत उडी घेतली. तिला वाचवण्यासाठी म्हणून तिच्या शेजार्‍यानेही नदीत उडी घेतली अशी माहिती पोलिसांनी दिली.