येत्या विधानसभेत भाजपला स्पष्ट बहुमत

0
107

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपलाच स्पष्ट बहुमत प्राप्त होणार असल्याचा दावा काल गोवा भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. त्याचप्रमाणे अजून तरी पक्षाने कुणाबरोबरही निवडणूकपूर्व युती न करण्याचा व ‘एकला चलो रे’चे धोरण अवलंबिण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. काल मंगळवारी झालेल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी त्यांनी वरील स्पष्टीकरण केले.

गेल्या सुमारे पाच वर्षांत पक्षाने केलेल्या कामामुळे राज्यातील जनता समाधानी असून जनता आम्हालाच कौल देणार असल्याचे तानावडे यांनी यावेळी सांगितले.

उमेदवारीविषयी केंद्रीय
नेत्यांशी चर्चेनंतर निर्णय

उमेदवारीच्या प्रश्‍नावरून पक्षातील काही नेते बंडखोरीची जी भाषा करीत आहेत त्याविषयी विचारले असता सर्वच नेत्यांना आपणाला उमेदवारी मिळावी असे वाटत असते. पण उमेदवारी काही सगळ्यांनाच देता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारीविषयी केंद्रीय नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जातो, असे तानावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांपैकी बरेचजण हे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारीवर निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे. त्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारले असता आपण कुणावरही त्याबाबत अविश्‍वास दाखवण्यास तयार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोविड काळातील सरकारच्या कामाचे
कार्यकारिणीच्या बैठकीत अभिनंदन

भारतीय जनता पक्षाच्या काल मंगळवारी झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारने कोविड महामारीच्या काळात कोविड रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या कार्याचे अभिनंदन करण्याचा ठराव संमत केला. प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कोविड महामारीच्या काळात प्रमोद सावंत सरकारने केलेल्या कार्याचे अभिनंदन करणारा ठराव नरेंद्र सावईकर यांनी मांडला होता. हा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आल्याचे तानावडे म्हणाले. राज्यात जेव्हा कोविड महामारी आली तेव्हा अनपेक्षितपणे आलेल्या या महामारीला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारकडे आवश्यक ती साधनसुविधा नव्हती. पण सरकारने प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली विनाविलंब आवश्यक ती साधनसुविधा उभारली. त्यामुळे राज्यातील हजारो कोविड रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य झाल्याचे सांगून या पार्श्‍वभूमीवर काल झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाने एकमताने त्यासंबंधी सरकारचे अभिनंदन करण्याचा ठराव मांडल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले.

कोविड लसीकरणाला वेग देऊन राज्यात ७ लाख ४५ हजार लोकांचे लसीकरण करून राज्यात ७० टक्के लोकांचे लसीकरण करण्याचे काम पूर्ण केल्याबद्दलही सरकारचे अभिनंदन करण्यात आल्याचे तानावडे यांनी नमूद केले.

राज्य कार्यकारिणीत कोविड योद्धे असलेल्या डॉक्टर्स, नर्सेस तसेच आघाडीवर असलेल्या अन्य सर्व कोविड योद्धांचेही अभिनंदन करण्यात आले, अशी माहितीही तानावडे यांनी दिली.
गेल्या नगरपालिका निवडणुकांत १० पालिकांवर भाजपचा झेंडा फडकवण्यास यश आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतानाच पक्षावर विश्‍वास दाखवणार्‍या लोकांचेही आभार मानण्यात आले.
खोटा प्रचार करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा निषेधही यावेळी करण्यात आला. येत्या विधानसभा निवडणूक व पक्षाच्या संघटनात्मक कार्याविषयीही बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नरेंद्र सावईकर व दामू नाईक हेही उपस्थित होते.

सानुग्रह निधी देण्याच्या निर्णयाचे स्वागत

ज्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे कोविडमुळे निधन झाले आहे अशा कुटुंबाला २ लाख रु.चा सानुग्रह निधी देण्याचा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे त्या निर्णयाचे बैठकीत जोरदार स्वागत करण्यात आल्याचे तानावडे म्हणाले. कोविडमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील दुर्बल घटकातील सुमारे २५ हजार कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून एकरकमी ५ हजार रु.ची जी मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्या निर्णयाचेही पक्षाने ठराव मंजूर करताना स्वागत केले असल्याचे तानावडे यांनी सांगितले.

त्याशिवाय राज्यातील विधवा महिलांचे पेन्शन २ हजार रु. वरून २५०० रु. करण्याचा तसेच अनाथ मुलांची काळजी घेण्यासाठी २ हजारांवरून ४ हजार रुपयांची वाढ करण्याच्या निर्णयाचेही स्वागत करण्यात आल्याचे ते म्हणाले.
त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अंदाजपत्रक मांडताना ‘सबका साथ-सबका विकास-सबका विश्‍वास’ या तत्त्वाचा अवलंब केल्याबद्दलही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले.