राफेल खरेदी व्यवहारात दलाली दिल्याचा आरोप

0
148

>> भारतीय कंपनीला दलाली दिल्याचा दावा

सन २०१६ साली भारताने फ्रान्सकडून खरेदी केलेल्या ३६ राफेल विमानांच्या व्यवहारात सदर विमानांचे निर्माते दासॉल्ट ऍव्हिएशन यांनी भारतातील एका मध्यस्थाच्या मालकीच्या कंपनीला १.१ दशलक्ष युरो दलाली दिल्याचा खळबळजनक आरोप फ्रान्समधील ‘मीडियापार्ट’ ह्या प्रसारमाध्यमाने केला आहे. फ्रान्सच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या लेखापरीक्षणात सदर दलालीची बाब उघडकीस आली होती, मात्र, फ्रान्स सरकारने त्याची अनाकलनीय कारणामुळे चौकशीच केली नाही असेही वृत्तात म्हटले आहे. हे पैसे भारत सरकारमधील कोणाला दिले गेले असा प्रश्नही सदर प्रसारमाध्यमाने उपस्थित केला आहे.

दासॉल्ट ऍव्हिएशनने फ्रान्सच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाला ३० मार्च २०१७ या तारखेचे एक बिल सादर केले होते. ‘डिफसिस सोल्युशन्स’ नामक भारतीय कंपनीचे सदर बिल आहे. राफेल विमानांच्या मोठ्या प्रतिकृती बनवण्याच्या कामाचा पहिला हप्ता म्हणून दिलेल्या रकमेचे सदर बिल असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्येक प्रतिकृतीसाठी २०,३५७ युरो मिळून एकूण १,०१७,८५० युरोंची ही मागणी नोंदवण्यात आली होती, त्यासाठी ‘ग्राहकांस भेटी’ अशी नोंद करण्यात आली होती, या व्यवहाराच्या मिशाने पन्नास टक्के रक्कम दिली गेली होती, परंतु प्रत्यक्षात अशा प्रकारच्या प्रतिकृती बनविण्यात आल्याचा कोणताही पुरावा दासाल्ट ऍव्हिएशन सादर करू शकली नाही असे सदर वृत्तात म्हटले आहे.

फ्रान्सच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत ही बाब ऑक्टोबर २०१८ मध्ये उघडकीस आली व हा दलालीचा प्रकार असल्याचा संशय बळावला.
ज्या ‘डिफसिस सोल्युशन्स’ चे नाव या प्रकरणात आले आहे ती राफेलची उत्पादक असलेल्या दासॉल्ट ऍव्हिएशनची भारतातील उपकंत्राटदार कंपनी आहे. मात्र, सदर कंपनीच्या १७० कर्मचार्‍यांपैकी कोणापाशीही विमानांच्या मोठ्या प्रतिकृती बनविण्याचे कौशल्य नाही व सदर कंपनी हवाई क्षेत्रासाठी विदेशी कंपनीच्या परवान्याखाली केवळ फ्लाईस सिम्युलेटर तयार करते असेही तपासात आढळून आले आहे.

सदर कंपनीच्या मालकांची ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहाराबाबत भारतात आधीच चौकशी सुरू आहे. तिचे मालक सुशेनमोहन गुप्ता यांना सक्तवसुली संचालनालयाने मार्च २०१९ मध्ये ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात दलाली घेतल्याच्या संशयावरून अटक केली होती व सध्या ते जामिनावर मुक्त आहेत.

‘तिसरा भाग अधिक खळबळजनक’
राफेल खरेदी व्यवहारासंदर्भातील शोधपत्रकारितेचा हा वृत्तांत तीन भागांत येणार असून हा पहिला गौप्यस्फोट आहे. याहून अधिक खळबळजनक माहिती दुसर्‍या व तिसर्‍या भागात दिली जाणार आहे असा दावा ‘मीडियापार्ट’च्या बातमीदाराने केला आहे.