राज्यातील दोन्ही कोविड इस्पितळांतील खाटा भरल्या

0
151

>> काही निर्बंधांची गरज ः विश्वजित; निर्बंधांचा विचार नाही ः मुख्यमंत्री

गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील खास कोविड उपचार विभागातील सर्व खाटा भरल्या आहेत. खाटांच्या अभावामुळे १० कोरोनाबाधित रुग्णांना इस्पितळात स्ट्रेचरवर ठेवण्याची पाळी ओढवली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन नसले तरी कोरोना रुग्णांचा फैलाव रोखण्यासाठी काही प्रमाणात निर्बंध घालण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत येत्या दोन-तीन दिवसांत काही निर्णय घेतले जाऊ शकतात, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी आरोग्य खात्याच्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत काल दिली.

मडगाव येथील जिल्हा इस्पितळात आणखी खाटा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मडगाव येथील ईएसआय इस्पितळ पुन्हा एकदा ताब्यात घेऊन कोविड केअर सेंटर सुरू केले जाऊ शकते. राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी थोडे निर्बंध घालण्याची नितांत गरज आहे. जनतेनेही आगामी चार महिने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. एकदम सर्व बंद करून काहीच साध्य होणार नाही. आपत्ती नियंत्रण समिती, मुख्यमंत्री, तज्ज्ञ समितीने वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपण निर्बंधांच्या विषयावर चर्चा करणार आहोत, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यातील एका व्यक्तीचा झालेला मृत्यू हा कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने झालेला नाही, असे स्पष्टीकरण गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिले. या व्यक्तीच्या मृतदेहाचे कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार शवविच्छेदन करण्यात आले आहे. सदर व्यक्तीचे अन्य आजाराने निधन झाले आहे, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी नवे निर्बंध घालण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमीच्या आवारात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. राज्य सरकारकडून शेजारील राज्यातील कोरोना रुग्णवाढीच्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. मात्र, लॉकडाऊन किंवा नवे निर्बंध लादण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रणासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कोविड स्वॅबच्या चाचण्यांमध्ये वाढ केली जात आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि सुरक्षा उपाययोजनांचे जनतेने पालन करावे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.