रानांत एकटेंच पडलेलें फूल

0
463
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

टिळकांच्या कवितेचे दोन प्रमुख गुण म्हणजे प्रसाद आणि प्रेमळपणा. त्यांच्या साधेसोपेपणामुळे त्यांचे काव्यसौंदर्य खुलते. त्यांना ‘फुलामुलांचे कवी’ म्हणून संबोधले जाते ते सार्थ वाटते. त्यांच्या सहजतेने आलेल्या शब्दांना लालित्य प्राप्त होते. ही रूपकळा ‘रानांत एकटेंच पडलेलें फूल’ या कवितेत दिसून येते.

रानांत एकटेंच पडलेलें फूल
वन सर्व सुगंधित झालें,
मन माझें मोहुन गेलें- किति तरी!
मी सारें वन हुडकीलें,
फुल कोठें नकळे फुललें- मज तरी.
स्वर्गांत
दिव्य वृक्षास
बहर ये खास,
असें कल्पीलें- असें कल्पीलें;
मन माझें मोहुन गेलें- किति तरी!
परि फिरतां फिरतां दिसलें
फुल दगडाआड लपलें- लहानसें
दिसण्यांत
फार तें साधें,
परी आमोदें
जगामधि पहिलें- जगामधिं पहिलें;
मन माझें मोहुन गेलें- किति तरी!
मी प्रेमें वदलों त्याशीं,
‘का येथें दडुनी बसशी- प्रिय फुला?
तूं गडे
फुलांची राणी,
तुला गे कोणीं,
रानिं धाडिलें- रानिं लावीलें?’
मन म्हणे थोडकें हंसुन! तेधवां
‘निवडिलें
प्रभूचें स्थान
रम्य उद्यान
तेंच मज झालें- तेंच मज झालें.’
मन माझें मोहुन गेलें- किति तरी!

  • ना. वा. टिळक

केशवसुतांचे समकालीन कवी रेव्हरंड ना. वा. टिळक यांचे मराठी कवितेतील कर्तृत्व उल्लेखनीय स्वरूपाचे आहे. केशवसुतांपेक्षा ते वयाने मोठे. या दोघांची नागपूरला भेट झाली. ‘दि गोल्डन ट्रेझरी’ या काव्यसंकलनात्मक पुस्तकाच्या अनुषंगाने कविता, काव्यनिर्मिती आणि आधुनिक काव्य यासंदर्भात दोघांची चर्चा झाली. हा सहवास परस्परांना प्रेरक ठरला. ना. वा. टिळक यांच्या पूर्वायुष्यातील मानसिक बैठक सर्वस्वी भिन्न होती. वयाच्या नवव्या वर्षापर्यंत ते कोकणात आजोळी करजगावला राहिले. नंतर शिक्षणासाठी ते कल्याण आणि नाशिकला गेले. थोडेफार इंग्रजी शिक्षण घेतल्यावर गणेशशास्त्री लेले या व्युत्पन्न पंडिताकडे त्यांनी आठ वर्षे संस्कृतचे शिक्षण घेतले. पारंपरिक पद्धतीने त्यांनी संस्कृत व्याकरण, काव्य, नाटक, धातुरूपावली, अमरकोश आदींचे शिक्षण घेतले. वयाच्या १८ व्या वर्षी लक्ष्मीबाईंशी त्यांचा विवाह झाला. चरितार्थासाठी त्यांनी ठिकठिकाणी भ्रमंती केली. नाशिक-खानदेश-वर्‍हाड, पुणे-मुंबई-कल्याणनजीकचे मुरबाड, नाशिक परिसरातील वणी (सप्तशृंगीचे ठिकाण) या ठिकाणी पुराणिक प्रवचनकार, कीर्तनकार, शिक्षक इ. व्यवसाय त्यांनी केले. पण कुठेच स्थैर्य नव्हते.

१८९५ साली मानसिक संघर्षाच्या एका क्षणी त्यांनी ख्रिश्‍चन धर्माचा स्वीकार केला. येथून त्यांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. १८९५ ते १९१७ या काळात त्यांनी अहमदनगर येथे वास्तव्य केले. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई १९०० मध्ये ख्रिश्‍चन झाल्या. टिळकांनी धर्मांतर केले खरे; पण धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे अशी त्यांची धारणा होती.

टिळकांच्या कवितेचे दोन प्रमुख गुण म्हणजे प्रसाद आणि प्रेमळपणा. त्यांच्या साधेसोपेपणामुळे त्यांचे काव्यसौंदर्य खुलते. त्यांना ‘फुलामुलांचे कवी’ म्हणून संबोधले जाते ते सार्थ वाटते. त्यांच्या सहजतेने आलेल्या शब्दांना लालित्य प्राप्त होते. ही रूपकळा ‘रानांत एकटेंच पडलेलें फूल’ या कवितेत दिसून येते. कविता म्हणजे लयबद्ध शब्दांची कलापूर्ण निर्मिती असते हे येथे प्रत्ययास येते. संवेदनक्षम वयातील मुलांच्या हातात अशा भाववृत्तीच्या कविता आल्या तर त्या शब्दांच्या तालाने, नादाने आणि लयीने त्यांच्या कानांत आणि मनात अशा नाजूक शब्दांचे गुंजन होत राहते. मन मोहून जाते. शब्दशक्तीचा, शब्दसौंदर्याचा साक्षात्कार आणि संस्कार मनाच्या भिजलेल्या मातीवर झाल्यामुळे त्यांची सृजनशीलता फुलून येते. सृष्टीचे दिव्यत्व त्यांच्या सोप्या शब्दांमधून आकळते. या कवीला बालजगताला लौकिक सृष्टीपासून अलगद दूर न्यायचे आहे. तेही अननुभूत आनंदाच्या नंदनवनात. हे चमत्कारांचे जग नसून अतिनिकटचेच असते. पण ते पाहण्याचे सौंदर्याचे डोळे आपल्याला लाभलेले नसतात. आनंदाची, दिव्यत्वाची आणि सौंदर्याची अशी मूस लाभण्यामुळे जीवनाला चिकटलेली सारी दुःखे दूर पळून जातात आणि ‘हेच ते प्रभूचे स्थान. माझ्यासाठी लाभलेले रमणीय उद्यान’ असे प्रत्येकाला वाटायला लागते.
कवी उद्गारतो ः
सारे वन सुगंधाने बहरून गेले आहे. माझे मन कितीतरी आनंदाने मोहून गेले आहे. मी सारे रान हुडकून पाहिले, पण फूल कुठे नक्की फुलले हे मला कळलेलेच नाही. ही नेणीवेची जाणीव ज्या शब्दांत व्यक्त झाली आहे ते संवेदन आल्हाददायी वाटते.

तो म्हणतो, ‘जवळपास हा पुष्पबहर जाणवत नाही त्याअर्थी स्वर्गातील दिव्य वृक्षास हा बहर आलेला असेल खास!’
‘असे कल्पीलें- असें कल्पीलें; मन माझे मोहुन गेले- किति तरी’
या पुनरावृत्तीमुळे या लयबद्ध स्वरावलीचा गोडवा वाढलेला आहे. शिवाय तिचा उच्चार हा बालमनाचा उत्स्फूर्त उद्गार वाटतो.

त्याचा शोध घेता घेता दगडामध्ये लपलेले लहानसे फूल लक्ष वेधून घेते. दिसायला ते अत्यंत साधे; पण सुगंधाने भरलेले आहे असे कवीला वाटते. अप्रत्यक्षपणे तो सुचवून जातो, ‘दिसणे’ महत्त्वाचे नसते; ‘असणे’ महत्त्वाचे असते. अर्थात येथे अर्थाची ओढाताण नाही.
जगामधिं पहिलें- जगामधिं पहिलें; मन माझें मोहून गेलें- किति तरी!
येथली पुनरावृत्तीही पहिल्याप्रमाणेच आनंद देते. फुलाच्या अपूर्वतेची जाणीव करून देते.
कवी त्या फुलाशी जाऊन म्हणाला, ‘प्रिय फुला, तुला येथे दडून बसण्याची इच्छा का बरं झाली? तू गडे फुलांची राणी आहेस! तुला कुणी बरं रानात पाठवून दिलं? रानात लावून दिलं?’
ते सुमन लाजत लाजत पुढे आले आणि स्मितवदनाने म्हणाले, ‘प्रभूने माझ्यासाठी हेच स्थान निवडले आहे. तेच रम्य उद्यान मानून राहणार आहे.’

तेच मज झालें, – तेंच मज झालें| मन माझें मोहुन गेलें- किति तरी!
या पुनरावृत्त आशयातून फुलाच्या अंतरंगातील आत्मतृप्तीचा भाव प्रकट झाला आहे; शिवाय फुलाच्या आविर्भावामधून कवीने चेतनगुणोक्तीचा समुचित पद्धतीने उपयोग केला आहे.
ही भावकोमल आशयाची कविता निरागसतेचे विश्‍व निर्माण करणारी आहे.