Home Featured राणेंच्या बंगल्यावरील आंदोलन, चौकशीसाठी समितीची नियुक्ती

राणेंच्या बंगल्यावरील आंदोलन, चौकशीसाठी समितीची नियुक्ती

0

महसूल सचिव संदीप जॅकीस अध्यक्ष

राज्याचे नगर नियोजन, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या दोनापावल येथील बंगल्याबाहेर झालेल्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने महसूल सचिव संदीप जॅकीस (आयएएस) यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती केली आहे.

यासंबंधीचा आदेश राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांनी जारी केला आहे. या समितीमध्ये एग्ना क्लिंट्स (आयएएस) आणि टिकम सिंग वर्मा (आयपीएस) यांचा समावेश आहे. या समितीकडून मंत्री राणे यांच्या खासगी निवासस्थाबाहेर झालेल्या आंदोलनाची कारणे आणि चुकांचा शोध घेतला जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.
सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांच्या आझाद मैदानावर टीसीपीच्या कलम 39 अ च्या विरोधात सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 23 फेब्रुवारी रोजी पणजीतील आझाद मैदानावर महाआंदोलनाचे आयोजन केले होते.

या महाआंदोलनासाठी जमलेल्या नागरिकांनी अचानक नगरनियोजन मंत्री राणे यांच्या दोनापावल येथील बंगल्यावर धडक देण्याचा निर्णय घेऊन दोनापावलच्या दिशेने कूच करून मंत्री राणे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी सुमारे आठ तास मुख्य रस्ता अडवून नागरिकांची गैरसोय केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

अनेक जणांविरोधात गुन्हा
या प्रकरणात पणजी पोलिसांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार वेंन्झी व्हिएगश, आमदार आल्टन डिकॉस्टा, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार क्रुझ सिल्वा, आरजीपीचे प्रमुख मनोज परब याच्यासह 1200 ते 1500 नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पणजी पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी काही सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाच्या नेत्यांना चौकशीसाठी नोटीस पाठविण्यात येत आहे. काहीजणांच्या जबान्या पोलिसांनी नोंदवून घेतल्या आहेत.