ॲड. सावईकर यांची माहिती
50 हजारांपेक्षा जास्त गोमंतकीय सध्या आखाती देशांत असून तेथे ते विविध क्षेत्रात काम करीत आहेत. मात्र, सध्या तरी त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेला नाही, असे अनिवास भारतीय व्यवहार आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांनी काल सांगितले. अमेरिका-इराण संघर्षामुळे मध्य पूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती असली तरी गोमंतकीयांच्या सुरक्षिततेबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे सावईकर यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या अनिवासी भारतीय व्यवहार कार्यालयामार्फत तेथील गोमंतकीयांच्या सुरक्षिततेविषयीची माहिती घेतली जात असल्याचे ते म्हणाले. सध्या तरी मध्यपूर्वेत असलेल्या गोमंतकीयांकडून धोका व समस्या असल्याची तक्रार नसल्याचे सावईकर यांनी सांगितले.
संयुक्त अरब अमिरात, कतार, सौदी अरबिया, ओमान, कुवेत व बहारीन या देशांत मोठ्या प्रमाणात गोमंतकीय कामाला आहेत. त्यात बांधकाम, पर्यटन, आरोग्य सेवा, हॉटेल उद्योग, वाहतूक तसेच माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात गोमंतकीयांनी आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे.
दरम्यान, काही गोमंतकीय सध्या सुटी अथवा वैयक्तिक कारणांसाठी गोव्यात आलेले आहेत.