बारा जागा देणार्‍या पक्षासोबत मगोप युती करणार ः ढवळीकर

0
43

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत जो पक्ष मगो पक्षासाठी बारा जागा सोडण्यास तयार असेल त्या पक्षाबरोबरच मगोप युती करणार असल्याचे काल पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर या वेळच्या विधानसभा निवडणुकीत आपण प्रियोळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे यांनी भाजपने उमेदवारी दिल्यास आपण प्रियोळमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे स्पष्ट केल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल दीपक ढवळीकर बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत आपण प्रियोळ मतदारसंघातून मगोपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार असून शिरोड्यातून निवडणूक लढवण्याचा आपला विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिरोडा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत दीपक ढवळीकर यांनी मगोच्या उमेदवारीवर तेथून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्याकडून अवघ्याच मतांनी पराभव पत्करावा लागला होता. तुमच्या या भूमिकेमुळे मगो-भाजप यांच्यातील संभाव्य युतीत अडथळे येतील असे तुम्हाला वाटत नाही काय, असे विचारले असता मगो-भाजप यांच्यात कुठे युती होऊ घातली आहे, असा प्रश्‍न त्यांनी केला. जे कोण मगो पक्षाशी युती करण्यास इच्छुक आहेत त्यांना मगोसाठी बारा जागा सोडाव्या तर लागतीलच, त्याशिवाय फोंडा तालुक्यातील सर्व चारही मतदारसंघ मगोपसाठी सोडावे लागतील, असे ढवळीकर म्हणाले.