राज्यात विविध पंचायतींकडून उत्स्फूर्त लॉकडाऊन

0
132

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची साखळी मोडून काढण्यासाठी काही राज्यांत संपूर्ण लॉकडाऊन केले जात आहे. मात्र, गोवा सरकारने जनतेने वारंवार मागणी करून सुध्दा संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. केवळ आठ दिवसांसाठी कोरोना निर्बंध लागू केले आहेत. मात्र, राज्यातील अनेक पंचायतींनी आपापल्या भागातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी आपणहून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे.

बंदर, कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्या कळंगुट मतदारसंघातील कळंगुट, कांदोळी या पंचायतींनी यापूर्वीच उत्स्फूर्त लॉकडाऊन सुरू केले आहे. बार्देशमधील पर्रा, गिरी, साळगाव या पंचायतींनी लॉकडाऊन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वरी भागातील सूकूर व इतर पंचायती सुध्दा लॉकडाऊनसाठी पुढे आलेल्या आहेत.

दक्षिण गोव्यातील वेर्णा पंचायतीने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात गावातील केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यत उघडी ठेवली जात आहेत. मडगावातील न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनने येत्या सोमवारपर्यंत दुकाने स्वतःहून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेले भाग कन्टेंनमेंट झोन म्हणून जाहीर केले जात आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची साखळी मोडून काढण्यासाठी सरकारने कोरोना निर्बंध कालपासून लागू केले आहे. या कोरोना निर्बंधांचा बाजारपेठेतील गर्दीवर हवा तसा परिणाम झालेला दिसून येत नाही. राजधानीतील मार्केटमध्ये गर्दी दिसून येत आहे. शहरातील बहुतांश दुकाने खुली असतात. त्यामुळे पणजी शहरात पुन्हा गर्दी वाढू लागली आहे.