राज्यात कोरोनाचे पंचवीस हजार रुग्ण

0
122

>> २४ तासांत आणखी ४६ बळी

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत उच्चांकी आणखी ४६ रुग्णांच्या बळींची नोंद झाली असून नवे २७०३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाखाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार ८३९ झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या १३२० वर पोहोचली आहे. राज्यात तीन दिवसांत १५२ रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४४.९५ टक्के एवढे आहे.

बांबोळी येथे गोमेकॉमध्ये २४ रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात १४ रुग्ण, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात २ रुग्ण, ईएसआय इस्पितळात १ रुग्णाचा मृत्यू, सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ रुग्णांचा मृत्यू , धारबांदोडा आरोग्य केंद्रात १ रुग्णाचा मृत्यू आणि उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात १ रुग्णाचा मृत्यू झाला. उत्तर गोव्यातील जिल्हा इस्पितळात दोन रुग्णांना मृतावस्थेत आणण्यात आले. इस्पितळामध्ये १६ रुग्णांचा चोवीस तासांच्या आत मृत्यू झाला आहे. एका रुग्णाला मृतावस्थेत धारबांदोडा आरोग्य केंद्रात आणले.

नवे २७०३ रुग्ण
चोवीस तासांत नवे २७०३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात ६०१३ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आला. राज्यात कोविड स्वॅबबाधित होण्याचे प्रमाण ४४.९५ टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९८ हजार ८८ एवढी झाली आहे.

मडगाव, कांदोळी, पर्वरी, पणजी, म्हापसा, फोंडा, कुठ्ठाळी या परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. मडगावातील रूग्णसंख्या २४५४ एवढी झाली आहे. कांदोळी भागातील रूग्णसंख्या १५९७, पणजीत १५७४ रुग्ण आहेत.

२४ तासांत २८८ इस्पितळात
चोवीस तासांत नव्या २८८ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून दरदिवशी दोनशे पेक्षा जास्त रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे. सरकारची आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ताणाखाली आली आहे.