राज्यात भाज्यांच्या दरात वाढ

0
14

वीज, पेट्रोल दरवाढीनंतर भाजीपाला महागला

राज्यात वीज, पेट्रोल दरवाढीनंतर आता, भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याने मध्यमवर्गीयांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पणजी मार्केटमध्ये टॉमेटोचा दर प्रतिकिलो 100 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, कांदा, बटाटे यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

राज्यात वीज दरवाढीनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. या दरवाढीला तोंड देणाऱ्या सामान्य नागरिकांना आता, भाजीपाल्याच्या दर वाढीला तोंड द्यावे लागत आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडायला लागले आहे. परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला गोव्यात आणला जातो. पावसामुळे परराज्यातील भाज्यांच्या उत्पादनात घट झाल्याने आवक कमी झाली असून भाज्यांच्या दरात वाढ होत आहे, असा दावा स्थानिक व्यापाऱ्यांकडून केला जात आहे.

राज्यात दोन दिवसांपूर्वी 50 रुपये प्रतिकिलो दराने टॉमेटोची विक्री केली जात होती. तर, रविवारी टॉमेटोची किंमत 100 रुपये प्रतिकिलो एवढी झाली आहे. मार्केटमध्ये टॉमेटोची आवक कमी झाली आहे. कांदे, बटाटे यांची आवक कमी झाल्याने दर प्रतिकिलो पन्नास रूपयांच्यावर पोहोचला आहे. कांदा, बटाटे यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजारामध्ये उपलब्ध असलेले कांदे, बटाटे दर्जेदार नाहीत.

बेळगाव, कोल्हापूर आदी भागांतून गोव्यात मोठ्या प्रमाणात भाजी आणली जात आहे. पावसामुळे परराज्यातील भाजी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या भाजीची आवक कमी झाली आहे. भाज्यांची आवक कमी झाल्याने दरात वाढ होत आहे, असे येथील महानगरपालिका बाजारामधील भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

आले, लिंबूही महागले

मार्केटमध्ये लिंबू, फ्रेंच बीन्स आणि कोबीसह इतर बहुतेक भाज्यादेखील महाग झाल्या आहेत. हिरवी मिरची आणि धणे, लसूण, आले आदींच्या दरात सध्या 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या किमतीमध्ये आणखीन होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्याच्या प्रारंभी स्थानिक पातळीवरील मुळा, लालभाजी, भेंडी व इतर स्थानिक भाज्यांची आवक कमी झालेली आहे. त्यामुळे स्थानिक भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. स्थानिक भाज्यांची आवक वाढल्यानंतर भाज्यांच्या किमतीमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.