आठवडाभरातील दुसऱ्या दरवाढीनंतर पेट्रोल 100 रुपयांच्या पार; डिझेल 92 रुपयांवर
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आठवडाभरात काल दुसऱ्यांदा वाढ झाली. पाच दिवसांपूर्वी पेट्रोल व डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर काल पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 90 पैशांनी महागले. परिणामी राज्यात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली असून, सध्याच्या घडीला पेट्रोलचे दर प्रतिलीटर 100 रुपये 56 पैसे असे आहेत.
इंधनाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली. मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी 90 पैशांची वाढ करण्यात आली. इंधनाच्या दरात आठवडाभरात झालेली ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी गेल्या शुक्रवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट 3 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता अवघ्या काही दिवसांतच पुन्हा 90 पैशांची वाढ झाल्याने महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आठवडाभरात 3.90 रुपयांची वाढ
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंधन दरवाढीचे सत्र पुन्हा सुरू होईल, अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. त्यानुसार आता पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा धडाका लावला आहे. गत आठवड्यात शुक्रवारी झालेली 3 रुपयांची वाढ आणि कालची 90 पैशांची वाढ मिळून, सर्वसामान्यांवर अवघ्या एका आठवड्यात प्रतिलिटर 3 रुपये 90 पैशांचा अतिरिक्त बोजा पडला आहे.
मालवाहतुकीचा खर्च वाढणार
या दरवाढीमुळे केवळ वाहनधारकांनाच फटका बसणार नाही, तर डिझेल महागल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार आहे. परिणामी, येत्या काळात भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूही महागण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे.
आणखी दरवाढीची शक्यता
पेट्रोलियम क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरवाढीमुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांना फारच थोडा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल व डिझेलची किरकोळ विक्रीची किंमत (रिटेल किंमत) आणि कंपन्यांना ज्या किमतीत पेट्रोल, डिझेल मिळते ती किंमत, यात खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी भाववाढ होऊ शकते.
उत्तर आणि दक्षिण गोव्यात इंधनाचे दर किती?
जागतिक पातळीवर इंधनाच्या दरात चढउतार होत असल्याने इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. उत्तर गोव्यात पेट्रोल प्रतिलीटर 100.40 ते 100.56 रुपये दराने उपलब्ध होत आहे.
दक्षिण गोव्यात उत्तर गोव्याच्या तुलनेत पेट्रोलचा प्रतिलीटर दर थोडा कमी आहे. दक्षिण गोव्यात 99.38 ते 100.30 रुपये प्रतिलीटर दराने विक्री केली जात आहे. स्पीड पेट्रोलचा दर 109.29 रुपये प्रतिलीटरवर पोहोचला आहे.
डिझेलच्या दरात वाढ झाली असून, उत्तर गोव्यात 92.17 रुपये प्रतिलीटरवर पोहोचले आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाली असून प्रतिकिलो 92 रुपयांवर पोहोचला आहे. इंधन दरवाढीमुळे महागाईमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.