मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केले आश्वस्त; एका महिन्याचा साठा उपलब्ध
घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातील वाढ आणि संभाव्य तुटवड्याचा विषय काल विधानसभेत चर्चेला आला. या चर्चेवेळी, मध्यपूर्वेत युद्ध सुरू असले तरी, त्यामुळे राज्यात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा भासणार नाही. राज्यात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा एक महिन्याचा साठा उपलब्ध आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून इंधनाच्या प्रश्नावर तोडगा काढला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य विधानसभेत काल दिली. आमदार उल्हास तुयेकर आणि मायकल लोबो यांच्या मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवरील आखाती देशांतील सद्य:स्थितीबाबतच्या एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
मध्यपूर्वेतील युद्धामुळे एलपीजी गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. एलपीजीच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने इंधन दरवाढीपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी व्हॅटच्या दरात कपात करावी, अशी मागणी आमदार वीरेश बोरकर यांनी केली.
राज्य सरकारने आखाती देशांत राहणाऱ्या आणि अडचणीत असलेल्या गोमंतकीय नागरिकांना मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विरोधी आणि सत्ताधारी गटातील आमदारांनी राज्य विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेवर बोलताना काल केली.
राज्य सरकारचे आखाती देशांतील एकंदर परिस्थितीवर लक्ष आहे. आखाती देशात अडचणीत असलेल्यांना केंद्रीय मंत्रालय आणि दूतावासाच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आखाती देशांतून दोन गोमंतकीय कुटुंबांना सुखरूपपणे गोव्यात परत आणण्यात आले आहे. आखाती देशांत अडचणीत असलेल्यांनी मदतीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाशी (सीएमओ) संपर्क साधावा, त्यांना भारतीय दूतावासाच्या माध्यमातून आवश्यक साहाय्य केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांत राहणाऱ्या गोमंतकीय नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. राज्य सरकारने केंद्रीय विदेश मंत्रालय आणि दूतावासाच्या माध्यमातून गोमंतकीय नागरिकांना आवश्यक मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मायकल लोबो यांनी केली.
राज्य सरकारने आखाती देशांतील दूतावासांच्या माध्यमातून सद्य:स्थितीची माहिती देण्यास सुरुवात करावी. त्यातून आखाती देशांत राहणारे गोमंतकीय आणि गोव्यात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना तेथील एकंदर परिस्थितीची माहिती मिळू शकेल, असे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले.
गॅस सिलिंडर बुकिंगचा नियम बदलला
दुसऱ्या सिलिंडरसाठी आता 25 दिवस वाट पाहावी लागणार
देशात दोन दिवसांपूर्वीच 14.2 किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर 60 रुपयांनी, तर व्यावसायिक गॅस सिलिंडर सुमारे 115 रुपयांनी महागला आहे. यानंतर गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नवा नियम निश्चित करण्यात आला आहे. गॅसची संभाव्य वाढती चणचण पाहून केंद्र सरकारने गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी वाढला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता पहिला सिलिंडर प्राप्त झाल्यानंतर दुसरा सिलिंडर 25 दिवसांनीच नोंदवता येणार आहे.
‘एलपीजी’ गॅसचा वापर घरात स्वयंपाकासाठी केला जातो. नागरिकांना दोन सिलिंडर वापरण्याची परवानगी असते. त्यासाठी पहिला सिलिंडर वापरायला सुरुवात केल्यानंतर 15 दिवसांनी अर्ज करता येत होता. आता हा कालावधी वाढविण्यात आला आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने तीन दिवसांपूर्वीच एलपीजी सिलिंडर बुकिंगचा कालावधी 15 दिवसांवरून 21 दिवस केला होता. आता तो आणखी वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना दोन सिलिंडर बुकिंगच्या दरम्यान किमान 24 दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. म्हणजे जर तुम्ही 1 तारखेला शेवटचा सिलिंडर बुक केला असेल, तर आता तुम्हाला 25 तारखेपूर्वी दुसरा सिलिंडर बुक करता येणार नाही. परिणामी दुसरा घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यासाठी आता 25 दिवस वाट पाहावी लागणार आहे.
काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना सरकारने हेही स्पष्ट केले आहे की, सध्या घरगुती गॅस, डिझेल किंवा पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. मात्र साठेबाजीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
गॅस वितरक कंपन्यांनी व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना महिन्यातून एकच गॅस सिलिंडर देण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत.