भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक तेजस्वी अध्याय जोडला गेला आहे. पुरुषांच्या टी-20 विश्वचषकातील भारताचे विजेतेपद हे केवळ चषक जिंकण्यापुरते मर्यादित नाही; तर ते संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे, धाडसी नेतृत्वाचे आणि दूरदृष्टी असलेल्या मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक यशामागे केरळचा संजू सॅमसन, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ‘कर्णधार’ सूर्यकुमार यादव यांचे योगदान प्रामुख्याने अधोरेखित करावे लागेल. संपूर्ण स्पर्धेत भारताने दाखवलेली कामगिरी ही संतुलित आणि आत्मविश्वासपूर्ण होती. सुपर-8 फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या पराभवाचा अपवाद वगळता भारतीय संघाने जवळपास प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. उपांत्य फेरीतील इंग्लंडविरुद्धचा सामना मात्र संघासाठी इशारा ठरला. त्या सामन्यात इंग्लंडने विजय जवळपास आपल्या हाती आणला होता. त्या अनुभवाने भारताला अंतिम फेरीसाठी अधिक सजग केले, हे नाकारता येत नाही. या यशात ‘कर्णधार’ सूर्यकुमार यादव याचे नेतृत्वही तेवढेच महत्त्वाचे ठरले. मैदानावर शांतपणे निर्णय घेण्याची त्यांची शैली, गोलंदाजांचा योग्य वेळी केलेला वापर आणि दबावाच्या क्षणी संघाला दिलेला आत्मविश्वास या गोष्टींमुळे भारताला निर्णायक क्षणी आघाडी मिळाली. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सूर्यकुमार या स्पर्धेत फलंदाज म्हणून अपयशी ठरला तरीसुद्धा रणनीतिक कर्णधार म्हणूनही समोर आला. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारताने सातत्य राखले. काही सामन्यांत भारताने प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने पराभूत केले, तर काही वेळा दबावाच्या क्षणी संयम राखत विजय मिळवला. हीच या संघाची खरी ताकद ठरली. क्षेत्ररक्षणात काही त्रुटी दिसल्या असल्या, तरी संघाची एकूण लढाऊ वृत्ती कायम राहिली. अंतिम सामन्यात भारताचा सामना नेहमीच कठीण प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या न्यूझीलंडशी झाला. या लढतीत भारताने आपल्या अनुभवाचा प्रभावी वापर केला. सलामीवीर अभिषेक शर्माने संपूर्ण स्पर्धेत अपेक्षित कामगिरी न करता आलेली असताना अंतिम सामन्यात मात्र धडाकेबाज खेळी साकारली. शिवम दुबेची बॅट वापरून ही खेळी केल्याचा खुलासा त्याने सामन्यानंतर केला होता. त्याच्या खेळीमुळे भारताला स्पर्धेत प्रथमच मोठी सलामी भागीदारी मिळाली आणि मजबूत धावसंख्येची पायाभरणी झाली. गोलंदाजांनीही या भक्कम धावसंख्येचे समर्थपणे रक्षण केले. विशेषतः सामन्याच्या मध्य टप्प्यात घेतलेल्या सलग बळींनी न्यूझीलंडच्या डावाची गतीच खुंटवली. शेवटच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी दाखवलेली अचूकता आणि संयम यामुळे प्रतिस्पर्ध्यांना मोठी खेळी उभारण्याची संधी मिळाली नाही आणि भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत संजू सॅमसनची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. ‘स्टेपनी’ म्हणून संघात संधी मिळालेल्या सॅमसनने फलंदाज म्हणूनच नव्हे, तर नेतृत्वक्षम खेळाडू म्हणूनही आपली छाप पाडली. निर्णायक क्षणी शांत राहून परिस्थितीनुसार खेळ करण्याची त्याची क्षमता भारतीय क्रिकेटसाठी आशादायी मानावी लागेल. प्रशिक्षक गौतम गंभीर यांची रणनीतीही या यशामागे तितकीच महत्त्वाची ठरली. त्यांनी युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समतोल साधत संघाला आक्रमकतेची नवी दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने केवळ सामने जिंकले नाहीत, तर जिंकण्याची मानसिकताही अधिक दृढ केली. गोलंदाजी आघाडीवर जसप्रीत बुमराह हा भारताचा सर्वात विश्वासार्ह अस्त्र ठरला. पॉवरप्लेपासून ते डेथ ओव्हर्सपर्यंत त्याने केलेली अचूक आणि भेदक गोलंदाजी प्रतिस्पर्ध्यांसाठी सतत धोकादायक ठरली. महत्त्वाच्या क्षणी घेतलेले त्याचे बळी भारताच्या विजयाचा भक्कम पाया ठरले. या विश्वचषकाने भारतीय संघातील नव्या पिढीचा आत्मविश्वासही अधोरेखित केला. युवा खेळाडूंनी मोठ्या मंचावर कोणतीही भीती न बाळगता केलेली कामगिरी भारतीय क्रिकेटच्या भविष्याबद्दल आशावाद निर्माण करणारी आहे. देशातील मजबूत क्रिकेट संरचना, विविध स्पर्धा आणि प्रशिक्षण व्यवस्था यांचा या यशामागे मोठा वाटा आहे. म्हणूनच हा विजय केवळ एका स्पर्धेतील यश म्हणून पाहता येणार नाही. तो भारतीय क्रिकेटच्या नव्या आत्मविश्वासाचा आणि सक्षम व्यवस्थेचा पुरावा आहे. सूर्यकुमार यादवसारखे रणनीतिक नेतृत्व, संजू सॅमसनसारखे धाडसी खेळाडू, जसप्रीत बुमराहसारखा भेदक गोलंदाज आणि गौतम गंभीरसारखे स्पष्टविचारी प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत भारतीय क्रिकेट पुढील काळातही जागतिक पातळीवर नवे विक्रम प्रस्थापित करील, अशी अपेक्षा व्यक्त करणे अतिशयोक्ती ठरू नये!