Home Featured पणजी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराची सांगता

पणजी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराची सांगता

0

पणजी महानगरपालिकेच्या बुधवार दि. 11 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची काल सांगता झाली. महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजप पुरस्कृत मंत्री बाबूश मोन्सेरात गट आणि युवा नेते उत्पल पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली ‘आम्ही पणजीकर’ गट यांच्यात चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत.

सरकारी यंत्रणेने मतदानाची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेतले जाणार आहे. महानगरपालिकेच्या 30 प्रभागांतून 69 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महानगरपालिकेच्या 23 प्रभागांत सरळ लढत होत आहेत. 6 प्रभागांत तिरंगी आणि एका प्रभागात पंचरंगी लढत होत आहे. भाजप पुरस्कृत बाबूश मोन्सेरात गट आणि युवा नेते उत्पल पर्रीकर पुरस्कृत ‘आम्ही पणजीकर’ गटाने सर्व 30 प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही गटांनी घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला. मंत्री बाबूश मोन्सेरात आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. तसेच, उत्पल पर्रीकर यांनी घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला आहे. दोन्ही गटाच्या उमेदवारांनी घरोघरी भेटी देऊन प्रचार केला आहे.

महानगरपालिकेत्या 30 प्रभागात एकूण 32,496 मतदार आहेत. त्यात 15,225 पुरुष मतदार आणि 17,271 महिला मतदारांचा समावेश आहे.
पणजी क्षेत्रातील सरकारी, खासगी, औद्योगिक आस्थापनांतील मतदारांना 11 मार्च रोजी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. यासंबंधीचा आदेश सर्वसाधारण प्रशासन विभागाने जारी केला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या क्षेत्रातील दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी झाला आहे. तसेच, महानगरपालिका क्षेत्रातील मद्यालये निवडणुकीनिमित्त बंद ठेवली जाणार आहेत. जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर पोलिसांनी विविध भागात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.