राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक

0
149

>> गुरूवारी २६५ नवे बाधित, एकाचा मृत्यू

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत राज्यात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. मागील चोवीस तासांत नवे २६५ बाधित नवे रुग्ण सापडले असून रुग्णवाढीच्या नव्या उच्चांकाची नोंद झाली. तसेच काल आणखी एका रुग्णाचा बळी गेला आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी अडीचशेपेक्षा जास्त बाधित रुग्ण आढळले असून राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या १७१६ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ८३१ एवढी झाली आहे. पणजी, मडगाव, फोंडा, वास्को, पर्वरी, कांदोळी, कुठ्ठाळी, कासावली म्हापसा या भागात मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळून येत आहेत. १० प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

राज्यात मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास प्रारंभ झाला. मार्च महिन्यात नवे ३०५३ बाधित रुग्ण आढळून आले असून ३५ रुग्णांचा बळी गेला आहे. मार्च महिन्यात ५३२ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. ५१ हजार २८५ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यातील ५.९५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी तपासणी करण्यात आलेल्या २६११ स्वॅबच्या नमुन्यांपैकी १०.१५ टक्के पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ३०४ एवढी झाली आहे. कोरोनाबाधित आणखी १०४ रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ५५ हजार ७५७ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६३ टक्के एवढे आहे.
कोरोना पॉझिटिव्ह नवीन ५८ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन २४ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

राजधानी पणजी आणि मडगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पणजीतील सध्याची रुग्णसंख्या १७६ झाली आहे. तर, मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १८५ झाली आहे. तसेच, १० प्रवासी कोरोनाबाधित झाले आहेत.

केअर सेंटर पुन्हा सुरू
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना कोरोना बळीची संख्या वाढत आहे. राज्यातील बंद करण्यात आलेली कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केली जात आहे. इस्पितळातसुद्धा रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे, असे डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले.

राज्यात आत्तापर्यंत १ लाख १७ हजार ९०१ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, इतर आजार असलेल्या नागरिकांचा समावेश आहे. राज्यात ९९ हजार २५५ जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, दुसरा डोस १८ हजार २४६ जणांना देण्यात आला आहे.

४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास सुरूवात
राज्यात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्यास कालपासून प्रारंभ करण्यात आला आहे. काल पहिल्या दिवशी ३००० नागरिकांना पहिला डोस देण्यात आला. नागरिकांनी सरकारी इस्पितळ किंवा लसीकरण केंद्रावर जाऊन लस टोचून घ्यावी, असे आवाहन लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी केले आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी कोविड मार्गदर्शक सूचनांचे कडक पालन करण्याची गरज आहे. मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य दक्षता घेण्याची गरज आहे. नागरिकांनी निष्काळजीपणे करू नये, जबाबदारीने वागले पाहिजे, असे डॉ. बोरकर यांनी सांगितले.

आता सुट्टीच्या दिवशीही लसीकरण होणार

>> केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी कालपासून देशात ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस देण्यास सुरूवात केली आहे. या लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने आता सुट्टीच्याही दिवशी लस देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. निर्धारित वेळेत लसीकरणाची पूर्ती करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राने गुरुवारी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व शासकीय आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर सुट्टीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुट्टीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवनवीन कृती कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटच्या त्रिसुत्रीनंतर लसीकरणावर जोर दिला जात आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका वाढत असल्याचे पाहून केंद्राने काही निर्णयही घेतले आहे. त्यात लसीकरणाला वेग देण्यावर जोर देण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे. तिथे दोन आठवड्यात लसीकरण करण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आलेल्या आहेत.
आता मध्यमवयीन व्यक्तींना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे केंद्राने लसीकरणाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लशींचा राज्यांना पुरेसा आणि वेळेवर पुरवठा केला जाईल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. राज्यांनी लसीकरणाची अद्ययावत आकडेवारी केंद्राला द्यावी. त्यानुसार लशींचा पुरवठा केला जाईल, असे केंद्राने आवाहन केले आहे.