आमदार अपात्रता याचिकाप्रकरणी सभापती सोमवारी घेणार सुनावणी

0
178

>> चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ६ रोजी सुनावणी

गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर सोमवार दि. ५ एप्रिल रोजी संध्याकाळी ३ वाजता मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर आणि गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकांवर सुनावणी घेणार आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात मंगळवार दि. ६ एप्रिल रोजी गिरीश चोडणकर यांच्या आमदार अपात्रता याचिकेवर सुनावणी होणार आहे.

राज्यातील बारा आमदारांच्या अपात्रताप्रकरणी ऑगस्ट २०१९ मध्ये सभापतींसमोर याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सभापतींना आमदार अपात्रताप्रकरणी याचिकेवर सुनावणी जलद गतीने घेण्याचे निर्देश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. कोविड महामारीमुळे आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणी लांबणीवर पडली होती. दोन आमदार अपात्रताप्रकरणी याचिकांवर सभापतीकडून कोणता निर्णय दिला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा सचिवालयाने गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष चोडणकर यांना नोटीस पाठवून ५ एप्रिल रोजी संध्याकाळी ३ वाजता आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे. कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चंद्रकांत कवळेकर व इतर ९ आमदारांच्या विरोधात चोडणकर यांनी अपात्रता याचिका दाखल केली आहे. सभापतींनी या आमदार अपात्रता याचिकेवर यापूर्वी अनेक वेळा सुनावणी घेतलेली आहे.

मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी मगोपतून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मनोहर आजगांवकर आणि दीपक पाऊसकर या दोन आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. सभापतींनी दोन आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिकेवर यापूर्वी सुनावणी घेतलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयात मंगळवार दि. ६ एप्रिल २०२१ रोजी गिरीश चोडणकर यांची आमदार अपात्रता प्रकरणी याचिका सुनावणीला येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ६ एप्रिलच्या न्यायालय क्रमांक १ च्या दैनंदिन याचिका सुनावणीच्या यादीमध्ये १३ व्या क्रमांकावर चोडणकर यांची याचिका आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या याचिकेवर सुनावणी होणार आहे, अशी माहिती याचिकादार गिरीश चोडणकर यांनी दिली.