राज्यात अपघातांची मालिका; ५ जणांनी गमावले प्राण

0
43

>> हडफडे खाडीत कार कोसळून मित्र-मैत्रिणीचा मृत्यू

हडफडे येथील एका खाडीमध्ये आलिशान कार कोसळून झालेल्या अपघातात पुणे येथील मित्र-मैत्रिणीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना काल पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.

हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम नितीन देडगे (२८) व ईश्वरी उमेश देशपांडे (२५) हे दोघे गेल्या बुधवारी पुण्याहून गोव्यात पर्यटनासाठी आले होते. सोमवारी पहाटे हडफडे येथून त्या भागातील एका हॉटेलात जात असताना कारवरील ताबा सुटून ती हडफडे खाडीत कोसळली. यावेळी शुभम आणि ईश्‍वरी कारच्या सेंट्रल लॉकमुळे गाडीतच अडकून राहिले. त्यामुळे त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कारसहित दोघांना पाण्याबाहेर काढले. हणजूण पोलिसांनी दोन्ही मृतदेह गोमेकॉ इस्पितळात ठेवले असून, त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली आहे. पुढील तपास निरीक्षक सूरज गावस करीत आहेत.

सकाळी कार खरेदी; रात्री अपघात

बांबोळी अपघातात पर्वरीतील तरुण ठार

बांबोळी येथे रविवारी रात्री झालेल्या अपघातात पर्वरीतील एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. विरल मेहता (रा. पुंडलिकनगर-पर्वरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. विरलच्या मित्राने रविवारी सकाळीच नवीन कार खरेदी केली होती; अन् त्याच रात्री त्या कारचा भीषण अपघात होऊन विरलचा मृत्यू झाला.

सविस्तर माहितीनुसार, पुंडलिकनगर येथील रोशन राणे याने रविवारी सकाळी (दि. १९) नवी कोरी स्कोडा कार (क्र. जीए-०३-झेड-९४२४) खरेदी केली होती. नवीन कारसह तो आपले दोन मित्र विरल मेहता आणि वरुण राय यांना घेऊन फिरावयास गेला होता. फेरफटका मारून झाल्यावर ते रात्री घरी परतताना बांबोळी येथील श्यामाप्रसाद स्टेडियमसमोरील रस्त्यावर त्यांचा कारवरील ताबा गेला. त्यावेळी वरुण राय हा कार चालवत होता. अतिवेगामुळे कारवरील वरुणचा कारवरील ताबा गेला आणि मधोमध असलेल्या रस्ता दुभाजकाला कार जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला, त्यात कार चालविणारा वरुण राय गंभीर जखमी झाला, तर मागच्या सीटवर बसलेला विरल मेहता याचा जागीच मृत्यू झाला. रोशन राणे हा किरकोळ जखमी झाला. गंभीर जखमी वरुण राय याला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. विरल मेहता याच्यावर सांतिनेझ येथील स्मशानभूमीत सोमवारी अंत्यसंस्कार पार पडले.

रस्ते अपघातात दोघां पोलिसांनी गमावला जीव

पेडण्यात सहाय्यक उपनिरीक्षक ठार

केरी-पेडणे येथे काल झालेल्या या अपघातात पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक नरेश नार्वेकर (वय ५०, रा. केरी) यांचा मृत्यू झाला. तर नगर्से-काणकोण येथे रविवारी रात्री झालेल्या अपघातात गंभीर जखमी पोलीस हवालदार संदेश भगत यांचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक नरेश नार्वेकर हे स्वतःच्या कारने निघाले असता वाटतेच काळाने त्यांना गाठले. नार्वेकर यांचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला, त्यात ते जागीच ठार झाले.

जखमी हवालदाराचे उपचारादरम्यान निधन

चाररस्ता-काणकोण येथील अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदार संदेश भगत (वय ५०, रा. भगतवाडा-काणकोण) यांचे काल उपचारादरम्यान निधन झाले. संदेश भगत हे ड्युटी संपवून रविवारी रात्री घरी परतत असताना चाररस्ता येथे रस्त्यावर बसलेल्या गुरांचा अंदाज न आल्याने त्यांचा अपघात घडला होता. त्यांना गंभीर अवस्थेत बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे.