राज्यातील पात्र वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण

0
42

>> मुख्यमंत्र्यांचा दावा; ११ लाख ४० हजार नागरिकांनी घेतला पहिला डोस

आतापर्यंत राज्यातील ११ लाख ४० हजार नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. त्यामुळे लसीकरणासाठी पात्र असलेल्या वयोगटातील जवळजवळ १०० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले.

राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांची संख्या साडेअकरा लाख एवढी आहे. ज्या १० हजार नागरिकांचा पहिला डोस शिल्लक राहिला आहे, त्यापैकी बर्‍याच लोकांनी एक तर परराज्यात पहिला डोस घेतलेला असावा किंवा सध्या ते राज्यात नसावेत. त्यामुळे लस घेण्यास पात्र असलेल्या वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे असे म्हणण्यास हरकत नसावी, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्या ६७ रुग्णांची नोंद

राज्यात काल गेल्या २४ तासांत कोरोनाचा संसर्ग झालेले आणखी ६७ नवे रुग्ण सापडले, तर कोविडमुळे काल आणखी दोघा जणांचा मृत्यू झाला.
काल ३९४५ जणांची कोरोनासाठी चाचणी करण्यात आली, त्यापैकी ६७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. गेल्या २४ तासांत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८० एवढी आहे. राज्यात कोविडमुळे आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ही ३२१० एवढी झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ही दर हा सध्या बराच खाली गेलेला असून, तो १.६ टक्के एवढा आहे. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.६५ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ८८५ एवढी आहे.