तालिबानकडून पंजशीरमधील युद्ध समाप्तीची घोषणा

0
40

अफगाणिस्तानमधील पंजशीरच्या खोर्‍यात तालिबान आणि नॉर्दन अलायन्स, तसेच माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांमध्ये सुरू असलेले युद्ध संपुष्टात आल्याची घोषणा काल तालिबानने केली. अफगाणिस्तानातील सर्व प्रांतांवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी तालिबानने सहा देशांना निमंत्रण पाठवले आहे. दुसरीकडे तालिबानने भारताशी अधिकृतपणे अजून संपर्क साधलेला नाही. दरम्यान, बुधवारी किंवा पुढील आठवड्यात नवे सरकार स्थापन होऊ शकते.

काबूलमध्ये सोमवारी तालिबान प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्याने अफगाणिस्तानमधील युद्ध संपले असल्याची घोषणा केली. अफगाणिस्तानची आता शांततेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. आता कोणीही शस्त्र हातात घेतल्यास ती व्यक्ती लोकांची शत्रू असेल, असे मुजाहिदने म्हटले आहे.

आम्ही पंजशीर प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. तसेच पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सच्या दबावाखाली असणार्‍या स्थानिकांची सुटका केली आहे. पंजशीरमधील सर्व नागरिकांचा सन्मान केला जाईल. त्यांच्याशी दुजाभाव केला जाणार नाही. ते सर्वजण आमचे बांधव आहेत.

या विजयामुळे देश युद्धामधून पूर्णपणे बाहेर पडला आहे. आता देशातील नागरिक शांततेत, स्वातंत्र्याच्या वातावरणात आणि मुक्तपणे जीवन जगतील, असा विश्वास जबीउल्लाह मुजाहिदने व्यक्त केला आहे.

सरकार स्थापनेसाठी सहा देशांना निमंत्रण
अफगाणिस्तानातील सर्व प्रांतांवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने देशात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार स्थापनेच्या कार्यक्रमासाठी तालिबानने चीन, पाकिस्तान, रशिया, इराण, कतार आणि टर्कीला निमंत्रण पाठवले आहे. या देशांनी यापूर्वीच तालिबान संघटनेशी संपर्क साधला आहे. अफगाणिस्तानात असलेल्या चीन, रशिया, टर्की आणि पाकिस्तानच्या दूतावासांनी आपले तिथले काम सुरुच ठेवले आहे.