पणजी मनपाकडून चतुर्थीसाठी मार्गदर्शक तत्त्वे

0
47

पणजी महापालिकेने कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. मूर्ती नेण्यासाठी गणेश चित्रशाळेत गर्दी उसळू नये, यासाठी एका कुटुंबांतील दोन व्यक्तींपेक्षा जास्त जणांनी चित्रशाळेत येऊ नये, असे म्हटले आहे. तसेच गणेश चित्रशाळेत गर्दी न करता सामाजिक अंतराच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जावे, असेही मनपाने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांतून स्पष्ट केले आहे. दरम्यान, चतुर्थीसाठी अवघे तीनच दिवस उरल्याने आता हळूहळू पणजी बाजारपेठेत विविध साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.

गणेशमूर्ती नेण्यासाठी एका वाहनातून दोघा व्यक्तींनाच गणेश चित्रशाळेत येता येईल. जे विक्रेते माटोळीचे सामान विकण्यासाठी पणजी शहरात येतात, त्यांना धेंपो हाऊसजवळ असलेल्या रॉयल फुड्‌सजवळ बसण्यासाठी जागा देण्यात येईल. दि. ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या दरम्यान त्यांना माटोळीच्या साहित्याची तेथे विक्री करावी लागेल. या विक्रेत्यांना तेथे कोणतेही स्टॉल्स उभारू दिले जाणार नसल्याचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

महापालिकेने परवानगी दिलेली फटाक्यांसाठीची दुकाने सोडून अन्य कुणालाही शहरात फटाके विकता येणार नाहीत. सार्वजनिक गणेशोत्सवांना आरत्या व त्यांचे अन्य कार्यक्रम करण्यासाठी सरकारी नियमावलीनुसार जी ५० टक्के क्षमतेची अट घालण्यात आलेली आहे, त्याचे त्यांना पालन करावे लागेल. शहरात वायू प्रदूषण होऊ नये, यासाठी भाविकांनी शक्यतो फटाके लावू नयेत. तसेच जे भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत, तेथे कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत, असेही मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.

विसर्जनासाठी नियमावली
गणेश विसर्जनासाठी एका कुटुंबातील २ ते ३ सदस्यांनीच यावे. निर्माल्य आणि फुलांचे हार आदी विसर्जन स्थळावर ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्यांत टाकाव्यात. तसेच विसर्जन स्थळी फटाके लावण्यास मनाई असेल. वाहने विसर्जन स्थळी नेता येणार नाहीत. तसेच संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेतच गणेश विसर्जन केले जावे. गणेश विसर्जनाच्या वेळी मिरवणुका काढण्यावर बंदी असेल. विसर्जनावेळी सामाजिक अंतर व मास्क हे सक्तीचे असेल.