राज्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी ३.०१ टक्के

0
84

>> चोवीस तासांत १ बळी, १२६ बाधित

राज्यात जुलै महिन्यात कोरोना रुग्णांच्या बळीमध्ये चढउतार सुरू आहे. यापूर्वी दोनवेळी शून्य बळीची नोंद झाली आहे. राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३.०१ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत नवे १२६ रुग्ण आढळून आले आहेत. तर, एका कोरोना रुग्णाच्या बळीची नोंद झाली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १७७९ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळींची एकूण संख्या ३१०२ एवढी आहे. राज्यातील नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही कमी होत आहे. हे प्रमाण आणखी कमी होण्याची गरज आहे.

दरम्यान, काल गुरूवारी इस्पितळातून १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६९ हजार ३४१ एवढी झाली आहे.

चोवीस तासांत ४०६३ स्वॅबच्या नमुुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १२६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.
कुठ्ठाळी येथे सर्वाधिक १२३ रुग्ण आहेत. मडगाव येथे ११३ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागांतील रुग्णसंख्या शंभरपेक्षा कमी आहे. नवीन १९ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. नवीन १०७ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.

राज्यातील आणखी १३४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६४ हजार ४६० एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१२ टक्के एवढे आहे.