राज्यसभेत एनडीए बहुमताच्या आकड्याजवळ

0
4

>> एनडीएचे संख्याबळ पोहोचले 118 वर, बहुमताचा आकडा 121; राज्यसभेत भाजप शतकाच्या उंबरठ्यावर

राज्यसभेच्या 56 जागासांठी द्विवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. राज्यसभेच्या 56 जागांपैकी 41 जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश राज्यातील एकूण 15 जागांसाठी निवडणूक लागली होती. राज्यसभेच्या 56 जागांची निवडणूक पार पडल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए आता राज्यसभेत बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचलेला आहे. राज्यसभेत एनडीएचे संख्याबळ आता 118 झाले आहे, तर सध्या राज्यसभेतील बहुमताचा आकडा 121 इतका आहे. राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष असून, त्यांच्याकडे 97 खासदार आहेत.

मंगळवारी उत्तर प्रदेशातील 10, कर्नाटकच्या 4 आणि हिमाचल प्रदेशातील एका जागेसाठी निवडणूक झाली होती. यामध्ये उत्तर प्रदेशात भाजपचे 8, तर समाजवादी पक्षाचे 2 उमेदवारी विजयी झाले. कर्नाटकमध्ये काँग्रेसने 3 आणि भाजपने एक जागा मिळवली. हिमाचल प्रदेशमधील जागा काँग्रेस आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे भाजपकडे गेली. या निकालानंतर राज्यसभेतील आकड्यांचे समीकरण बदलले आहे.

राज्यसभेच्या 56 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर भाजपच्या संख्येत वाढ झाली आहे. भाजपचे 28 खासदार निवृत्त झाले होते. भाजपने उत्तर प्रदेशात एक आणि हिमाचल प्रदेशमध्ये एक अधिकचा खासदार निवडून आणला. यामुळे त्यांची संख्या 30 वर पोहोचली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे 9 खासदार निवडून आले आहेत. तृणमूल काँग्रेसचे 4, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस पार्टीचे 3, समाजवादी पक्षाचे 2, राजदचे 2, बिजू जनता दलाचे 2, शिंदे शिवसेनेचा 1, जदयूचा 1, भारत राष्ट्र समितीचा 1, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी झाले होते.

राज्यसभेच्या सध्याच्या संख्याबळानुसार 240 ही सदस्यसंख्या आहे. भारतीय संविधानानुसार राज्यसभेची सदस्यसंख्या 238 आणि 12 राष्ट्रपती नियुक्त खासदार अशी एकूण 250 आहे. मात्र, सध्याची सदस्यसंख्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 233 आणि राष्ट्रपती नियुक्त 12 सदस्य अशी एकूण 245 आहे. त्यापैकी जम्मू काश्मीरच्या चार जागा रिक्त आहेत. राष्ट्रपती नियुक्त खासदाराची एक जागा देखील रिक्त आहे. त्यामुळे 240 ही सदस्यसंख्या निश्चित केल्यास बहुमताचा आकडा 121 असा ठरतो. आता एनडीएची सदस्य संख्या 118 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे एनडीए राज्यसभेत बहुमताच्या आकड्यापासून केवळ 3 पावले दूर आहे.