वासुदेव देशप्रभूंना शिक्षेतून दिलासा नाहीच

0
4

>> तीन अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरण; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळली

तीन अल्पवयीन मुलांना मारहाण केल्या प्रकरणी पेडणेचे माजी नगराध्यक्ष वासुदेव देशप्रभू यांना बाल न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेच्या प्रकरणात कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल नकार दर्शवला. उच्च न्यायालयाने बाल न्यायालयाचा आदेश उचलून धरला असून, देशप्रभू यांनी दाखल केलेली आव्हान याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने देशप्रभूंना 4 आठवड्यांत बाल न्यायालयात शरण येण्याचा आदेश दिला आहे.

बाल न्यायालयाने गेल्या 16 नोव्हेंबर 2023 रोजी तीन अल्पवयीन मुलांना शिविगाळ व मारहाण प्रकरणी वासुदेव देशप्रभू यांना तीन महिने साधी कैद आणि 1.10 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी शिक्षेच्या कार्यवाहीला 12 डिसेंबर 2023 पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. देशप्रभू यांनी बाल न्यायालयाच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते.

अल्पवयीन मुलांना मारहाणीचे प्रकरण वर्ष 2013 मध्ये म्हापसा येथे घडले आहे. एका पीडित मुलाच्या वडिलांनी म्हापसा पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली होती. यानंतर वासुदेव देशप्रभू यांना अटक करून पोलिसांनी बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

बाल न्यायालयाने वासुदेव देशप्रभू यांना गोवा बाल कायद्यांतर्गत तीन महिन्यांची साधी कैद आणि 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. हा दंड न भरल्यास 4 महिन्यांची साधी कैद, तसेच मुलांना मारहाण केल्याप्रकरणी 5 हजार रुपये दंड, पुरावे नष्ट केल्या प्रकरणी 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. हे दोन्ही दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिन्याची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली होती. दंड भरल्यास 50 टक्के रक्कम पीडित मुलाच्या नावे राष्ट्रीय बँकेत ‘कायम ठेव’ म्हणून ठेवण्याचा निर्देश देण्यात आले होते.