राज्यभरात बरसल्या मुसळधार सरी

0
113

>> आज, उद्या अतिवृष्टीची शक्यता; ‘रेड अलर्ट’ जारी

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे जनजीवनावर काहीसा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवार पाठोपाठ आज आणि उद्या देखील राज्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून, राज्याला ‘रेड अलर्ट’चा इशारा दिलेला आहे.

काल राजधानी पणजीसह राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. पणजी परिसरातील काही रस्त्यांवर, तसेच सखल भागात पाणी साचले. पाणी साचलेल्या रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या राज्यात संचारबंदी असल्याने आणि जोरदार पाऊस पडत असल्याने बाजारपेठांमध्ये कमी गर्दी दिसून आली.
वास्को परिसरात देखील जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे चिखलीत मुख्य रस्त्यावर झाडे कोसळले. परिणामी या मार्गावरील वाहतूक विमानतळ मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली. जोरदार पावसामुळे वास्को बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.

डिचोली तालुक्यात सुद्धा मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. तसेच अनेक सखल भागात पाणी साचले. काणकोण तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे तालुक्यातील गालजीबाग, तळपण, तसेच साळेरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ जूनपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. परिणामी गोवा व कोकण किनारपट्टीवर पुढील दोन दिवस मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, रविवारी राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. या दिवशी सर्वाधिक पाऊस वाळपई येथे कोसळल्याची माहिती खात्याने दिली.

सतर्कतेचा इशारा
मंगळवार दि. १५ व बुधवार दि. १६ जून रोजी राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पाणी भरुन रस्ते तसेच शेती पाण्याखाली जाण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर घाट परिसरात दरडी कोसळणे, झाडे पडणे, आदी दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे सतर्क राहण्याचा इशाराही हवामान खात्याने नागरिकांना दिला आहे.

खराब हवामानाचा विमानसेवेला फटका

मुसळधार पाऊस आणि हवामानातील बदलामुळे दाबोळी विमानतळावरील विमान वाहतुकीवर परिणाम झाला. अतिवृष्टीमुळे दाबोळी विमानतळावर उतरणारे कन्नूर गोवा कन्नूर हे सकाळचे इंडिगो विमान रद्द करण्यात आले, तर संध्याकाळी एअर इंडियाचे ५१२ हे कोचिन-गोवा, तर एअर इंडियाचे ५१३ गोवा-दिल्ली या विमानांना खराब हवामानामुळे एक तास उशीर झाला. कोविड महामारीमुळे सध्या दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कन्नूर अशी दहाच विमाने दाबोळी विमानतळावर उतरत आहेत.