राजधानी पणजीत वाहतूक कोंडी

0
132

>> मुख्य रस्त्यावर गटार बांधणीसाठी खोदकाम; चालकांचे हाल

येथील जुन्या टपाल कार्यालयाजवळ गटार बांधणीसाठी मुख्य रस्त्यावर खोदकाम करण्यात आल्याने सोमवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. संततधार कोसळणार्‍या पावसामुळे या वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली. येथील वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले, तरीही दुपारपर्यंत वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होऊ शकली नव्हती.

पणजी शहरात प्रवेश करणार्‍या रस्त्यावर गटार बांधणीसाठी रविवारपासून खोदकाम सुरू करण्यात आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने त्याचा वाहतुकीवर फारसा परिणाम जाणवला नाही; परंतु सोमवारी सकाळी शहरात प्रवेश करणार्‍या वाहनांची संख्या भरपूर असल्याने दिवजा सर्कल ते बसस्थानकापर्यंत वाहनांची रांग लागली होती. वाहतूक विभागाची पर्यायी व्यवस्था देखील मोठ्या संख्येतील वाहनांमुळे कोलमडून पडली.
अखेर वाहतूक पोलिसांनी मुख्य रस्त्यावरील दुभाजक हटवून काही वाहने दुसर्‍या रस्त्यावर वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक कोंडी कायम होती. त्यामुळे थोडी वाहतूक दिवजा सर्कलजवळील मार्गावरून शहरात सोडण्यात आली. एकीकडे वाहतूक कोंडी, तर दुसरीकडे जोरदार पाऊस यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली.

ऐन पावसाळ्यात काम घेतले हाती
जुन्या टपाल कार्यालयाजवळ मुख्य रस्त्यावर गटाराचे बांधकाम करण्यात येणार्‍या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबून राहत आहे. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी ऐन पावसाळ्यात खोदकाम करून गटार बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.