‘आप’चे आगमन

0
142

पुढील वर्षी होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व चाळीसही मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा आम आदमी पक्षाच्या राज्य संयोजकांनी केली आहे. गोव्याच्या राजकारणामध्ये सक्रियपणे उतरण्याची आस बाळगणार्‍या राजकीय पक्षांपैकी ‘आप’ हा एक आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्याने गोव्यात उतरून पाहिले आणि आपटीही खाल्ली. परंतु यावेळी ज्या प्रकारे आम आदमी पक्ष राज्याच्या राजकीय क्षितिजावर पूर्ण ताकदीनिशी उतरलेला आहे, ते पाहिले तर मागील वेळेसारख्या हवेतल्या वल्गना ह्यावेळी केल्या जाणार नाहीत, तर प्रत्यक्ष जमिनीवरील कामाच्या माध्यमातून गोमंतकीय जनतेच्या ह्रदयाला स्पर्श करण्याचा आटोकाट प्रयत्न ‘आप’कडून केला जाईल असे दिसू लागले आहे.
मागील पराभवांनी आणलेले नैराश्य झटकून, तत्कालीन स्थानिक नेत्यांच्या विशिष्ट कंपूतून पक्षाला अलगद बाहेर काढून आणि गेले दीड वर्ष गोव्याला हादरवून सोडणार्‍या कोरोनाकाळामध्ये गोमंतकीय जनतेला मदतीचा हात देत आम आदमी पक्षाने यावेळी ज्या प्रकारे आपली हवा निर्माण केलेली आहे, ती पाहता भाजपविरोधी इतर पक्षांपेक्षाही अधिक जिद्दीने आणि सक्रियपणे हा पक्ष येत्या निवडणुकीत उतरेल अशी चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पक्षापाशी प्रचंड आर्थिक बळही यावेळी दिसते आहे. मात्र, आपल्या पुढील वाटचालीचे सूतोवाच करताना एका महत्त्वाच्या गोष्टीकडे राज्य संयोजकांनी नुकताच अंगुलीनिर्देश केला आहे, तो म्हणजे कोणत्याही भाजपविरोधी पक्षाशी हातमिळवणी केली जाणार नाही. ह्याचे अनेक अर्थ निघतात. ‘आप’चे गोव्यातील आगमनामागचे प्रयोजन नेमके काय आहे हा प्रश्नही यातून अर्थातच उद्भवतो. त्याला भाजपाला कमकुवत करण्यापेक्षा कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगो आदी भाजपविरोधी पक्षांची मते स्वतःकडे वळवायची आहेत, ती मतपेढी मिळवायची आहे का असा प्रश्नही नक्कीच विचारला जाऊ शकतो आणि ‘आप’च्या यावेळच्या आर्थिक ताकदीमागचे कोडेही मग उलगडू लागते.
आम आदमी पक्षाने कोरोनाकाळ ही सुसंधी मानून गोमंतकीयांच्या ह्रदयाला स्पर्श करण्याचा यावेळी पुरेपूर प्रयत्न केला आहे. ऑक्सिमित्र योजना असो, रुग्णांना वैद्यकीय प्राणवायू पुरवणे असो, रुग्णांच्या नातलगांना अन्नपुरवठा करणे असो, राज्य सरकारने एकीकडे जनतेला वार्‍यावर सोडल्याचे चित्र निर्माण झालेले असताना ती पोकळी भरून काढण्यासाठी आम आदमी पक्ष पुढे सरसावला आणि त्याने जनतेचे लक्ष वेधून घेण्याचा जोरदार प्रयत्न गेल्या काही महिन्यांत केला. मतदारांच्या मोबाईलवरील स्वयंचलित कॉल आणि एसएमएसपासून कोरोना रुग्णांसाठीची हेल्पलाईन आणि वैद्यकीय सल्ल्यापर्यंत अनेक प्रकारे मतदारांना आकृष्ट करण्याची धडपड ह्यातून स्पष्ट दिसते. ज्या प्रमाणे गुजरात मॉडेल भाजपा मतदारांपुढे ठेवीत असे, त्याच प्रकारे कोरोनाविरुद्धच्या लढाईचे दिल्ली मॉडेल ‘आप’ने गोमंतकीयांपुढे ठेवलेले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही आपने बरीच वातावरणनिर्मिती केली होती, परंतु ती ऐन निवडणुकीच्या वेळी. पक्षाचा गोव्यातील चेहरामोहरा त्यावेळी केवळ ख्रिस्ती मतदारांना आकर्षित करणारा होता. ह्यावेळी पक्षाने आपली रणनीती बदललेली दिसते. राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा केवळ संघटनात्मक कामामध्ये लक्ष घालणार्‍या कार्यकर्त्यांद्वारे पक्षाची संघटनात्मक उभारणी ज्या प्रकारे चालली आहे तीही लक्षवेधी आहे. कॉंग्रेसी उमेदवारांच्या घाऊक आयातीमुळे यंदा उमेदवारी मिळणार नसलेल्या भाजपातील अनेक बंडखोरांसाठी ‘आप’ची वाट ह्यावेळी खुणावते आहे. त्याबाबत पक्ष किती औत्सुक्य दाखवील हे पाहावे लागेल.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी निवडणूक अजून दूर असतानाच ‘आप’ने गोव्यात उडी घेतलेली दिसते आहे आणि त्यांची पावलेही यावेळी अत्यंत पद्धतशीरपणे पडत आहेत. मध्यंतरी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये पक्षाला एक जागा मिळाली आणि गोव्याच्या राजकीय क्षितिजावर त्याचे आगमन झालेच आहे. आता दिल्लीपुरते सीमित न राहता गोव्यापासून गुजरातपर्यंत सर्वत्र उडी घेण्याची महत्त्वाकांक्षी योजना पक्षाने बाळगलेली दिसते. गोव्यासह सर्वत्र ह्या पक्षाला लागलेली फुटीची वाळवी यापुढे लागणार नाही ह्याची काळजी घेणे पक्षनेत्यांना जमेल का हेही पाहावे लागेल. भायलो – भितल्लोची भावना प्रबळ असलेली गोव्याची जनता ह्या पक्षाला आणि नेत्यांना कितपत स्वीकारील हे येणारी निवडणूक सांगेल, परंतु आपल्या प्रयत्नांत ‘आप’ ने ह्यावेळी कोणतीही कसर ठेवल्याचे दिसत नाही. अर्थात, भाजपविरोधी पक्षांनी उद्या महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही एकत्र यायचे ठरवले तर ‘आप’ची भूमिका त्यावेळी काय राहील हे पाहणेही नक्कीच औत्सुक्याचे राहणार आहे. गोव्याच्या राजकीय क्षितिजावर पदार्पण करताना आपली स्वतःची स्वतंत्र जागा निर्माण करण्याचा ‘आप’चा हा प्रयत्न गेल्यावेळेप्रमाणे यावेळी दुर्लक्षून झटकून टाकण्याजोगा मात्र नक्कीच नाही!