रविवारी पाचशेपेक्षा कमी कोरोनाबाधित

0
90

>> ४०३ नवे रुग्ण, १६ जणांचा मृत्यू

>> संचारबंदी वाढवण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडून आदेश जारी

राज्यातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या पाचशेपेक्षा कमी झाली आहे. चोवीस तासांत नवे ४०३ रुग्ण आढळून आले असून आणखी १६ कोरोना रुग्णांच्या बळींची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या २,७६० तर, सध्याच्या रुग्णांची संख्या ७ हजार १५४ एवढी झाली आहे. नवे कोरोना रुग्ण आढळून येण्याची टक्केवारी १३.३३ वर आली आहे. तर, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७८ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी १६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मागील तीन दिवस सलग १७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये १० रुग्णांचा, दक्षिण गोवा इस्पितळात ५ रुग्णांचा आणि दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या दोन रुग्णांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला होता.

नवे ४०३ रुग्ण
राज्यात चोवीस तासांत नवे ४०३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या ३०२२ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यातील १३.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यात दरदिवशी तीन हजारांच्या आसपास स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या दिलासा देणारी आहे. चोवीस तासांत इस्पितळामधून ७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५९ हजार ३९३ एवढी झाली आहे.

राज्यातील विविध भागांतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ५८० एवढी झाली आहे. राजधानी पणजी परिसरात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३३४ आणि चिंबलमधील रूग्णसंख्या २५२ एवढी आहे.

२४ तासांत ७३ जण इस्पितळांत
गेल्या चोवीस तासांत नव्या ७३ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहेत. राज्यात इस्पितळांत दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांच्या संख्येचेही प्रमाण बरेच कमी झाले आहे.

१४४९ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाबाधेतून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाबाधित आणखी १४४९ रुग्ण काल बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४९ हजार ४७९ एवढी झाली आहे.

विशेष गटांतील ४७८८
नागरिकांचे लसीकरण

राज्यातील विशेष गटांतील १८ ते ४४ वयोगटातील ४७८८ जणांना कोरोना प्रतिबंधक लस काल रविवारी देण्यात आली.
या विशेष गटांच्या लसीकरणासाठी राज्यभरात ५६ केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. १० वर्षांखालील मुलांच्या ४७६० पालकांना आणि दिव्यांग विभागात २८ जणांना लस देण्यात आली आहे.
राज्यातील सरकारी आणि खासगी इस्पितळात ४५ वर्षांवरील १४७५ जणांना लस देण्यात आली आहे. राज्यातील ९७ हजार ३८६ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस देण्यात आले आहेत. तर, ३ लाख ६३ हजार ६७३ नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत ५ लाख ५८ हजार ४४८ लशीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने ७ लाख ५९ हजार ५०० डोस उपलब्ध केले आहे.

१५ वर्षांखालील मुलांच्या
पालकांना आजपासून लस

पंधरा वर्षे आणि त्या खालील मुलांच्या पालकांना आज सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरवात करण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

संचारबंदी वाढवण्याबाबत दोन्ही
जिल्हाधिकार्‍यांकडून आदेश जारी

राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी काल संचारबंदी येत्या १४ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवण्याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील संचारबंदीत १४ जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला होता. या संचारबंदीच्या काळात सकाळी ७ ते संध्याकाळी ३ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत. पूर्वी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती.

हॉटेल, रेस्टॉरंटमधील पार्सल सेवा कायम राहणार आहे. स्टेशनरी, पावसाळी साहित्य, इमारत बांधकाम साहित्य विक्रीची दुकाने उघडी ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. इतर निर्बंध कायम असतील. निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे. राज्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या मार्केटमधील जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, स्टेशनरी, पशुखाद्य आदी सामानांची विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ३ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मान्यता देण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.