रखडलेले आरोग्य प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने आढावा बैठक

0
66

आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन बांबोळी येथील सुपर स्पेशलिटी ब्लॉक आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्याबाबतच्या कार्यपद्धतीचा आढावा काल घेतला.

आरोग्य खात्याच्या प्रमुख प्रकल्पाच्या कामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली खास बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.

बांबोळी येथील सुपर स्पेशलिटी ब्लॉक हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा प्राप्त होणार आहेत. आरोग्य खात्याने कोविड महामारीच्या काळात विविध आरोग्य प्रकल्पाच्या कामांकडे जास्त लक्ष केंद्रित केले नव्हते. आरोग्य खात्याचे अधिकारी कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामात गुंतले होते. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आरोग्य खात्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामांना पुन्हा चालना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असेही आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले. या बैठकीला आरोग्य सचिव रवी दिवाण व इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती.