येत्या सहा महिन्यांत खाण उद्योग सुरू

0
208

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही

राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग येत्या सहा महिन्यांत सुरू होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्र दरबारी जाऊन आवश्यक ते सगळे काही केले असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपल्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौर्‍यात आपण केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह विविध नेत्यांशी खाण प्रश्‍नावर चर्चा करून प्रश्‍न धसास लावला असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. सगळे सोपस्कार पूर्ण करून राज्यातील खाणी येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यात सरकारला यश येणार असल्याचा विश्‍वास सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

खाणी संदर्भात कोण काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. खाणी कोणत्याही परिस्थितीत येत्या सहा महिन्यांच्या काळात सुरू होतील यासाठी सर्व ते काही केले जात असल्याचे सावंत म्हणाले.
गोव्याच्या खाणीचा विषय केंद्र सरकारने गंभीर घेतलेला असून केंद्राने या खाणी लवकर सुरू करता याव्यात यासाठी चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत बैठकांचे आयोजन केलेले असून त्या पार्श्‍वभूमीवरच नुकतीच नवी दिल्लीत एक बैठक संपन्न झाल्याचे काल मुख्यमंत्री म्हणाले.
सहा महिन्यांच्या आत खाणींचा लिलाव करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल काय, असे विचारले असता खाणी येत्या सहा महिन्यांत सुरू होतील असे आपण म्हटले आहे. सहा महिन्यांत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून खाणी सुरू करणे शक्य आहे, असे सांगतानाच सरकारने अन्य पर्यायांचाही विचार चालवला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जिल्हा पंचायत निवडणुका
डिसेंबर महिन्यातच
जिल्हा पंचायत निवडणुका चालू महिन्यांतच होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाला आम्ही तसा प्रस्ताव दिलेला आहे असे सांगतानाच निवडणुकांची तारीख आयोग ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.