दक्षिण दिग्विजयासाठी

0
238

देशभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष काल हैदराबादच्या महापालिका निवडणुकीकडे लागले होते. एखाद्या महापालिका निवडणुकीला राज्य विधानसभा निवडणुकांएवढे महत्त्व येण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. त्याचे कारणही अर्थात तसेच होते. भारतीय जनता पक्षाने ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीमध्ये आपली सर्व ताकद लावून दक्षिण दिग्विजयाची आपली मोहीम पुन्हा तेज केली होती. पक्षाचे बडे बडे नेते त्या निवडणुकीच्या प्रचारात एखाद्या विधानसभा निवडणुकीत उतरावे तसे उतरले होते. गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा अशा सर्व बड्या नेत्यांनी या निवडणुकीला रंगतदार बनवले होते.
चंद्रशेखर रावांच्या तेलंगणा राष्ट्रसमितीची राजवट सध्या तेलंगणात आहे. त्यांच्या राजधानीत उतरून तेथील सत्ता काबीज करण्याची भाजपची ही मोहीम जरी पूर्णांशाने यशस्वी ठरली नसली, तरी देखील भविष्याचा विचार करून तेथे आपले पाय भक्कमपणे रोवण्यात भाजप या निवडणुकीत यशस्वी ठरला आहे. मतमोजणीच्या सुरवातीला तर टपाली मतांची मोजणी सुरू झाली तेव्हा भाजपानेच त्यात आघाडी घेतल्याचेही दिसत होते, परंतु जसजसा सविस्तर निकाल येऊ लागला, तसतसे टीआरएसने आपले बस्तान बसवले. मात्र, भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे तेथे सत्ताधारी पक्षाला टक्कर दिली ते भविष्याचा विचार करता अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.
भारतीय जनता पक्षाने आतापावेतो दक्षिण भारत वगळता देशाचा बहुतेक सर्व भाग – अगदी ईशान्येपर्यंत काबीज केला आहे. कर्नाटक वगळता दक्षिण भारत मात्र भाजपला वेळोवेळी हुलकावणी देत राहिला आहे. त्यामुळे ही त्रुटी भरून काढण्यासाठी भाजप गेली काही वर्षे जंग जंग पछाडतो आहे. आंध्र, तेलंगणा, केरळ आणि तामीळनाडूमध्ये पक्षकार्य वाढवण्यावर प्रचंड भर देण्यात आला आहेच, शिवाय तेथील स्थानिक नेते आणि राजकीय पक्ष यांना आपल्या बाजूने वळवण्याची एक मोठी मोहीम भाजपने पद्धतशीरपणे राबविलेली दिसते. हैदराबाद महापालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी टीआरएस प्रमुख दावेदार होता आणि असदुद्दिन ओवैसींचा एमआयएम तेथील मुस्लीम मतांचे प्रतिनिधित्व करीत आला आहे. या दोहोंना हादरा देण्याचे काम भाजपने या निवडणुकीत तेथे केले आहे.
ग्रेटर हैदराबाद महापालिका क्षेत्रामध्ये दीडशे प्रभाग आहेत. म्हणजेच तेलंगणाचे तब्बल २४ विधानसभा मतदारसंघ आणि चार लोकसभा मतदारसंघ त्यात येतात. एवढ्या मोठ्या क्षेत्रासाठीची ही निवडणूक त्यामुळे प्रतिष्ठेची बनवून भाजपने आपले बडे नेते प्रचारासाठी त्यात उतरवले होते. ‘यांनी केवळ डोनाल्ड ट्रम्पला आणायचे बाकी ठेवले होते’ असे ओवैसी उद्गारले ते उगीच नाही. ओवैसींच्या विरोधात ध्रुवीकरणासाठी हैदराबादचे नामांतर भाग्यनगर करण्याचा मुद्दा योगी आदित्यनाथांना उचलला, एमआयएमवाल्यांना शहांनी रझाकार संबोधले आणि निझामाच्या संस्कृतीतून मुक्त करायचे आवाहन मतदारांना केले होते. देश स्वतंत्र झाला तेव्हा निझाम भारतात यायला तयार नव्हता आणि त्याच्या रझाकारांनी हैदराबादेत कसा हैदोस घातला होता हे सर्वश्रृत आहेच. त्यामुळे शहांच्या या आवाहनाने ध्रुवीकरणाचे काम चोख बजावले. त्यातूनच भाजपने या निवडणुकीत बर्‍यापैकी यश संपादन केले आहे. दुब्बक मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीला जिंकून भाजपने अलीकडेच चमत्कार घडवला होताच. महापालिका निवडणुकीतील यश हे त्यापुढचे पाऊल आहे. भाजपची खरी नजर अर्थातच २०२३ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीवर आणि सध्या तोंडावर आलेल्या तामीळनाडू विधानसभा निवडणुकीवर आहे. दक्षिण भारतामध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्नांची ही शर्थ केली जाते आहे. तेलंगणाच्या मागील निवडणुकीत टीआरएसने एकतर्फी विजय संपादन केला होता, परंतु हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ९९ जागांवर थेट आणि ५१ जागांवर तिहेरी झुंज देऊन आपली वाढती ताकद दाखवून दिली आहे. दक्षिणेतील बदलाची ही सुरूवात मानली गेली तर नवल नाही. सध्या तेलंगणच्या विधानसभेत भाजपचे अवघे दोन आमदार आहेत. महापालिकेत जेथे चार होते, ती संख्या आज त्याच्या कैक पटींनी वाढवता आली असेल तर मग विधानसभा निवडणुकीतही ते अशक्य नसेल हा भाजपचा होरा आहे आणि हे सगळे त्याचेच पूर्वनियोजन आहे. आज भाजपचा जो राष्ट्रव्यापी विस्तार झालेला आहे, त्यामागे अशा प्रकारचे शिस्तबद्ध पूर्वनियोजन असते. प्रत्येकवेळी यश मिळतेच असे नाही, परंतु पुढच्या यशाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम अशा प्रकारे केले जाते. इतर राजकीय पक्षांनी यापासून शिकण्यासारखे खूप काही आहे! विशेषतः दिल्लीत बसून उंटावरून शेळ्या हाकणार्‍या कॉंग्रेसने तर नक्कीच!