Home Featured युनिटी मॉल प्रकल्प अन्यत्र नेणार

युनिटी मॉल प्रकल्प अन्यत्र नेणार

0

चिंबल येथील नियोजित युनिटी मॉल प्रकल्पाला होणारा ग्रामस्थांचा वाढता विरोध लक्षात घेऊन पर्यटन खात्याने अखेर युनिटी मॉल प्रकल्प अन्यत्र नेण्याचा काल निर्णय घेतला आहे. युनिटी मॉल प्रकल्पाला दरदिवशी विरोध वाढत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल आयोजित केलेल्या बैठकीला ग्रामस्थ अनुपस्थित राहिले. तसेच या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांनी उद्या शुक्रवारी 30 जानेवारी रोजी जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकांच्या वाढत्या विरोधामुळे युनिटी मॉल प्रकल्प अन्य ठिकाणी नेण्याची सूचना पर्यटन खात्याला केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक व इतरांशी याबाबत चर्चा केली. आता पर्यटन खात्याकडून नवीन जागेचा शोध घेतला जाणार आहे.
युनिटी मॉल तोयार तलावाच्या प्रभाव क्षेत्रात किंवा तोयार तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येत नाही. आपण विधानसभेतही हीच माहिती दिली होती. युनिटी मॉलच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या लोकांचा हेतू काय आहे हे मला माहीत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकाराशी बोलताना सांगितले.

तळ्याचे सर्वेक्षण पूर्ण
चिंबल येथील तोयार तळ्याच्या परिसराचे संयुक्त सर्वेक्षण काल पूर्ण करण्यात आल्यानंतर सरकारी पथकाने संयुक्त सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना सादर केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी चिंबल नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार तोयार तळ्याच्या क्षेत्राचे संयुक्त सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. गेल्या 24 जानेवारीपासून तोयार तळ्याच्या क्षेत्राच्या संयुक्त सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आली. जलस्त्रोत खात्याचे निवृत्त मुख्य अभियते, जीटीडीसीचे सल्लागार प्रमोद बदामी यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तोयार तळ्याजवळील नियोजित युनिटी मॉल विषयावर चर्चा करण्यासाठी काल बुधवारी संध्याकाळी खास बैठक आयोजित केली होती. या बैठकीला चिंबल ग्रामस्थांच्या प्रतिनिधीना निमंत्रित करण्यात आले होते. तथापि, चिंबल ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी या बैठकीला उपस्थिती लावली नाही. तोयार तळ्याच्या परिसराच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त सरकारी अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थिती लावली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी संयुक्त सर्वेक्षणाबाबत सखोल माहिती जाणून घेतली.

तळे आणि प्रकल्पाची जागा
वेगवेगळ्या पाणलोट क्षेत्रात

चिंबल येथील नियोजित युनिटी मॉल प्रकल्पाचा परिसर अधिसूचित तोयार तळ्याच्या प्रभाव क्षेत्र किंवा पाणलोट क्षेत्रात येत नाही, ते जलशास्त्रीयदृष्ट्या जोडलेले नाहीत. त्यामुळे तोयार तळ्याच्या जलपुरवठ्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता नाही, असा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे. तथापि, राज्य सरकाने संयुक्त सर्वेक्षणाबाबतचा अहवाल जाहीर केलेला नाही.

आंदोलन सुरूच राहणार ः खोलकर
चिंबल येथील युनिटी मॉल प्रकल्प अन्य ठिकाणी हलविण्याबाबत चिंबल ग्रामस्थांना अजूनपर्यंत काहीच माहिती देण्यात आलेली नाही. ग्रामस्थांचे आंदोलन आज गुरुवार 29 जानेवारीला सुरूच राहणार आहे असे आंदोलनातील एक नेते अजय खोलकर यांनी सांगितले.