बारामतीला विमान उतरताना झाला अपघात
अपघातात दोन पायलटांसह पाचजणांचा मृत्यू
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार (66) यांचा काल बुधवारी एका विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. काल सकाळी बारामतीमध्ये झालेल्या या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक, विमानाचे दोन पायलट आणि फ्लाइट अटेंडंट अशा 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते नेहमीप्रमाणे लवकर निघाले होते. ते ज्या विमानाने निघाले ते विमान मुंबईहून बारामतीसाठी निघाले होते. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य पाचजणदेखील विमानात होते. त्या सर्वांचा या अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर विमान पूर्णपणे जळून खाक झाले होते. अजित पवारांचे पार्थिव बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, आज गुरूवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
बुधवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी अजित पवारांच्या विमानाला बारामतीमध्ये अपघात झाला. बारामतीमध्ये लँडिंग करताना विमान एका शेतात कोसळले. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीने पेट घेतला. आगीत संपूर्ण विमान जळून खाक झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राज्यभरातील कार्यकर्त्ये, नेते आणि सर्वसामान्यांमधूनही हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई येथून सकाळी 8.10 वा. सदर विमानाने टेक ऑफ घेतला व बारामतीला 8.50 ची लँडिंग वेळ होती.
बोम्बार्डीयर कंपनीचे विमान
अपघात झालेले सदर विमान हे बोम्बार्डीयर कंपनीचे लिअरजेट 45 जातीचे होते. या प्रकारच्या विमानाचे आतापर्यंत जगभरात सहा अपघात झालेत. त्यातील चार अपघात जीवघेणे होते. दोन अपघातांत विमान अनियंत्रित झाले होते. अजित पवारांच्या विमान अपघातातदेखील ते अनियंत्रितच झाले होते. याआधी 2003 मध्ये सततच्य़ा बिघाडामुळे लिअरजेट 45 विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
नेमके काय घडले?
अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे. पहिल्यांदा विमान वरुन गेले, त्यानंतर गावातून खालून विमान येत होते. नंतर विमान फिरले आणि खाली जमिनीला लागले. जागेवर फिरले व मोठा स्फोट होऊन विमानाचे तुकडे उडाले.
घड्याळावरून ओळख
अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या घड्याळावरून झाली. हे घड्याळ त्यांची ओळख पटवण्यासाठी मुख्य निशाणी ठरली. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव होते.
मुख्यमंत्रीपदाची इच्छा अपूर्ण
अजित पवार आतापर्यंत सातवेळा उपमुख्यमंत्री झाले. काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाखालील अनेक सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आपण उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड केला, असे ते स्वतःच मिश्किलपणे म्हणायचे. मात्र पवार यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. अत्यंत अनुभवी राजकारणी असलेल्या अजित पवार यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा कधीच लपवली नाही. मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न त्यांनी स्वतःदेखील अनेकदा बोलून दाखवले होते. मात्र त्याची ही इच्छा अखेर अधुरीच राहिली.
तीन दिवसांचा दुखवटा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा घोषीत केला आहे. या तीन दिवसांच्या राजकीय दुखवट्यादरम्यान, महाराष्ट्रातील सर्व सरकारी इमारतींवर जिथे नियमितपणे राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो तो अर्धा झुकवला जाईल. या कालावधीत कोणताही सरकारी मनोरंजन कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. तसेच काल बुधवारी 28 रोजी महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती.
विमानात कोण कोण होते?
या विमानाला अपघात झाला त्यावेळी विमानात पाच प्रवासी होते. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई पीएसओ एचसी विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, पायलट कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता.
वक्तशीर नेता
अजित पवार हे एक कष्टाळू माणूस मानले जात होते. अनेक राजकारणी हे कार्यक्रमांना उशिरा पोहोचण्यासाठी प्रसिद्ध असले तरी, अजितदादा हे मात्र वक्तशीर होते, वेळेवर पोहोचायचे. ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे.