पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यावर भर दिला. डोनाल्ड ट्रम्प यांचा याबाबत फोन आल्याचे नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी या संवादाबाबत माहिती देताना सांगितले की, पश्चिम आशियातील परिस्थितीवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सहमती झाली. भारत पश्चिम आशियात तणाव कमी करण्याचा आणि शक्य तितक्या लवकर शांतता प्रस्थापित करण्याचा समर्थक आहे. भारताची भूमिका नेहमीच संवाद आणि राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवण्याची राहिली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा शांततेचा संदेश दिला आहे.
नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या विषयावर पुढील काळातही संपर्कात राहण्याचे ठरवले आहे. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर एकत्रितपणे काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
इराण-इस्रायलचे एकमेकांवर हल्ले सुरुच
इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेले युद्ध थांबायचे नाव घेत नाही अशाच स्थितीत आहे. इराणने मंगळवारी इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने इराणच्या गॅस पाईपलाइन्सवर हल्ला केला. पाच दिवसांसाठी हल्ले थांबवण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर अचानकच हे हल्ले झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवरील संभाव्य हल्ले पाच दिवस लांबणीवर टाकण्याची घोषणा सोमवारी केली होती. होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.