बंगळुरूतील गुन्ह्याबाबत माहिती लपवल्याचा आरोप; आज अधिकाऱ्यांसमोर सुनावणी
गोवा विधानसभेच्या फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक यांच्या उमेदवारी अर्जाविरोधात काँग्रेसकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. गीतेश नाईक यांच्याविरुद्ध बंगळुरू येथे गुन्हा नोंद झाल्याची कागदपत्रे काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांचे वकील तथा आमदार कार्लुस फेरेरा यांनी काल निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केली. या गुन्ह्याबाबतची माहिती उमेदवाराने लपवून ठेवल्याचे आक्षेप नोंदवताना म्हटले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांसमोर बुधवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार असून, त्यानंतर पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी सकाळी अर्ज छाननी करण्यात आली. त्यावेळी आम आदमी पक्षाचे गीतेश नाईक यांनी दाखल केलेल्या अर्जावर काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांचे वकील तथा आमदार कार्लुस फेरेरा यांनी आक्षेप घेतला.
गीतेश नाईक यांच्याविरुद्ध बंगळुरू येथील पोलीस स्थानकात गुन्हा नोंद आहे. यासंबंधीची माहिती उमेदवाराने लपवून ठेवल्याचे आक्षेपात म्हटले आहे. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचा आदेश गीतेश नाईक यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला.
आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक यांच्या विरोधात बंगळुरू येथील पोलीस स्थानकात गुन्हा नोंद आहे. त्यासंबधीची माहिती अर्जात नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मंगळवारी आक्षेप घेण्यात आला. त्यावर बुधवारी सकाळी सुनावणी होणार असल्याचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी सांगितले.
आज चित्र स्पष्ट होणार
काल निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जांची छाननी केली. त्यानंतर आजचा दिवस हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी असून, सायंकाळपर्यंत लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.