राज्य सरकारचा निर्णय; पोलीस उपमहानिरीक्षकांकडून प्रकरणाचा आढावा; पीडितांच्या जबानी नोंदवण्याचे काम सुरू
राज्य सरकारने कुडचडे येथील कथित वासनाकांड (सेक्स स्कँडल) प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, या वासनाकांडाचे तपासकाम कुडचडे पोलिसांकडून गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडे (क्राईम ब्रांच) काल हस्तांतरित करण्यात आले. आता, या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडून केला जाणार आहे.
संशयित सोहम नाईक याने एका प्रकरणामध्ये एका अल्पवयीन पीडिताला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढून घेतले. त्यानंतर तिला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले. तसेच, सदर अश्लील चित्रिकरण आपल्या मित्रांना पाठविले. ही घटना 1 जानेवारी 2023 ते 30 जून 2023 या काळात घडली. दुसऱ्या प्रकरणामध्ये संशयिताने सोशल मीडियावरून एका अल्पवयीन मुलींशी ओळख करून तिला एक अश्लील फोटो पाठवून बदनाम करण्याची धमकी देण्यास सुरूवात केली. तिला प्रत्यक्ष भेटण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करू लागला. तसेच, तिच्या मैत्रिणीचे संपर्क क्रमांक देण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करू लागला. ही घटना वर्ष 2024 ते 2025 या काळात घडली, अशी माहिती समोर आली आहे.
कुडचडे पोलिसांनी कथित वासनाकांड प्रकरणात सोहम सुशांत नाईक याला अटक करून चार दिवसांचा रिमांड घेतला आहे. या प्रकरणातील संशयित सोहम नाईक हा कुडचडे नगरपालिकेचे नगरसेवक सुशांत नाईक यांचा पुत्र असल्याने कुडचडे पोलिसांवर राजकीय दबाव येण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाचा निःपक्षपाती तपास करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. स्थानिकांचा कुडचडे पोलिसांनी सुरू केलेल्या तपासकामावर विश्वास नाही. सदर वासनाकांड प्रकरण उघडकीस आल्यानंतर कुडचडे पोलिसांनी त्यांची गंभीर दखल घेतली नव्हती. अखेर ग्रामस्थांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चोवीस तासांची मुदत दिल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी कुडचडे पोलीस स्थानकात काल सकाळी भेट देऊन कथित वासनाकांड प्रकरणाचा आढावा घेतला. या प्रकरणाचा तपास सुरू असून पीडितांच्या जबानी नोंदवून घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती वर्षा शर्मा यांनी दिली.
आतापर्यंत दोन गुन्हे दाखल;
आणखी तीन तक्रारी नोंदवल्या
या कथित वासनाकांड प्रकरणात आत्तापर्यंत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आणखी तीन तक्रारी कुडचडे पोलिसांत दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन पीडितांचे जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे. वासनाकांड प्रकरणातील गुन्हे आणि तक्रारी गुन्हा अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. या वासनाकांडाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास केला जात आहे, असे पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले.
तक्रारदारांची ओळख गुप्त ठेवणार
या वासनाकांड प्रकरणातील पीडित आणि तक्रारदारांची ओळख गुप्त ठेवली जाणार आहे. पीडितांना आवश्यक संरक्षण दिले जाणार आहे. कुडचडे पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हा विभागाला सहकार्य केले जाणार आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिली.