यंदा दीपावलीचा फराळ ः आयुर्वेद शास्त्रानुसार

0
344
  • डॉ. मनाली म. पवार
    (सांतइनेज, पणजी)

दीपावलीमध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतींनी फराळाचे जिन्नस बनवले जातात. हा फराळ फक्त मनाला आनंद देत नाही तर या फराळांच्या कृती तसेच त्यांच्या गुणधर्माचे वर्णनही आयुर्वेद शास्त्रामध्ये आढळते. या काळात जाठराग्नी प्रदीप्त होतो म्हणून आरोग्यप्राप्ती व्हावी या दृष्टीने दिवाळीत विशेष फराळ घेण्याची पद्धत असते.

भारतीय संस्कृतीत दीपावली हा फार मोठ्या रोषणाई व फराळाचा सण. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, पुढे तुळशीचे लग्न, आवळी भोजन, त्रिपुरारी पौर्णिमा व मग मनुष्यमात्रांचे लग्नसमारंभ. दीपावलीला सुरु झालेला हा फराळ असा पुढे चालू…
दीपावलीचे हे चार दिवस जरी बघता बघता पार पडले तरी उत्साह, आनंद हा पुढे पुरणारा आहे. ऋतुमानाचा विचार केला तर दिवाळीनंतर येणारा हेमंत ऋतु, हवेतील गारवा हे सर्व पाहता दीपावलीत सुरू झालेला अभ्यंगादी उपचार, शरीरपोषक तरीही रुचकर आहार. हे सर्व पुढे चालू ठेवणे आरोग्यासाठी पूरक असते.
दीपावलीच्या फराळात चकली, करंजी, कडबोळी, चिरोटे, अनारसे, शंकरपाळे, चिवडा, लाडू अशा विविध पदार्थांचा थाट असतो. त्याचबरोबर पक्वांन्नांमध्ये खीर, घीवर, मुगाचे वडे, उडदाचे वडे असे नाना प्रकार. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतींनी फराळाचे जिन्नस बनवले जातात. हा फराळ फक्त मनाला आनंद देत नाही तर या फराळांच्या कृती तसेच त्यांच्या गुणधर्माचे वर्णनही आयुर्वेद शास्त्रामध्ये आढळते. या काळात जाठराग्नी प्रदीप्त होतो म्हणून आरोग्यप्राप्ती व्हावी या दृष्टीने दिवाळीत विशेष फराळ घेण्याची पद्धत असते. प्रदीप्त झालेल्या अग्नीला यथायोग्य इंधन मिळाले नाही तर तो अग्नी रसधातूला जाळून टाकतो व त्यातूनच वायूचा प्रकोप होतो. असे होऊ नये म्हणून या ऋतूत स्निग्ध, आंबट, खारट पदार्थ खावेत. सुधारलेल्या पचनशक्तीचा फायदा घेऊन या ऋतूत शरीरपोषक, धातुपोषक पदार्थ करण्याची प्रथा आहे. यात चकली, शेवेसारखे तळलेले पदार्थ, खारट- तिखट पदार्थही असतात. तसेच अनारसे, करंजी, लाडूसारखे शुक्रपोषक रसायन पदार्थही असतात.
दिवाळीच्या निमित्ताने आपण यांची आयुर्वेदिक पद्धत पाहू या. या कोरोनाच्या महामारीच्या काळात जेव्हा बाहेरचे खाण्याची भीती वाटते त्याचप्रमाणे मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास भेसळयुक्त मिठाईचीपण भीती आहेच.
१) चकली (वेष्टनी) ः
फराळांचा राजा म्हणजे चकली

माषाणां घूमसी हिलवणार्द्रकसंयुता |
जलेन निबिडं मर्द्य कार्याः पृथुलवर्तयः
कृत्वा तासां वर्तुलानि जले संस्वेदयेत् ततः
गृह्वियात वेष्टनी नाम्ना शुक्रला बलकारिणी ॥

उडदाचे पीठ, हिंग, मीठ, बारीक केलेले आले हे सर्व पदार्थ पाण्यात एकत्र घट्ट मळून नंतर त्याच्या वाती करून वर्तुळे करावीत आणि वाफेवर शिजवावीत. किंवा आत्ताच्या पद्धतीप्रमाणे दातेदार चकल्या करायच्या असतील तर साचा वापरावा व चकल्या तुपात तळाव्या.
चकलीचे गुणधर्म ः

  • या चकल्या थोडे पित्त वाढवतात पण प्रवास करणार्‍यांसाठी हितकर आहेत.
  • तुपात तळल्यावर पचायल्या थोड्या जड झाल्या तरी ताकद वाढवतात.
  • तृप्ती देतात
  • शुक्रवर्धक असतात.
  • अग्नी वाढवतात.
  • पित्त-कफदोष वाढविणार्‍या असल्या तरी वातशामक आहेत.
    सध्या तळण्यासाठी तेलाचाच वापर सर्वत्र केल्या जातो. त्यामुळे तेल वापरताना काळजी घ्यावी. स्वस्त पडते म्हणून कुठलेतरी तेल न वापरणेच चांगले. आरोग्याच्या दृष्टीने तिळाचे किंवा शेंगातेल वापरणे चांगले. ही तेले रिफाईंड नसावी फक्त फिल्टर्ड असली तरी पुरे.
    २) कडबोळी ः
    पाचित च घृते सैव कचवल्लीति विश्रुता |
    चकली तुपामध्ये तळली असता त्याला कचवल्ली (कडबोळी) असे म्हणतात.
  • कडबोळी पचायला जड, ताकद वाढवणारी, वजन वाढवणारी, तृप्ती देणारी, शुक्रवर्धक अशी असते.
  • अग्नी वाढवते, पित्त-कफदोष वाढवणारी व वातशामक असते.
    ३) करंजी ः
    गोधूमानां सूक्ष्मपिष्टं घृतअृष्टं सितायुतम् |
    चूर्णे तस्मिन् क्षिपेदेलां लवं मरिचानि च ॥
    नारिकेलं सकर्पूरं चारीबीजानि मिश्रयेत् |
    दुग्धेन धूमसीं मर्द्य तस्याः पर्पटिकासु च ॥
    तत्पुरणं तु निक्षिप्. कुर्यान्मुद्राः दृढां सुधीः|
    सर्पीषि प्रचुरे तां तु पचेत् निपुणयुक्तितः॥

गव्हाचा रवा तुपात भाजून त्यात साखर, वेलची, लवंगा, मिरी, नारळ, चारोळ्या, थोडा कापूर मिसळून सारण तयार करावे.
मग गव्हाचा बारीक रवा दुधात भिजवावा व चांगला मळावा. त्याच्या छोट्या छोट्या पापड्या लाटाव्या. आत रव्याचे सारण भरावे. अर्ध्यात वाकवून दोन्ही कडांना मुरड घालावी. तुपात तळून साखरेच्या पाकात बुडवून काढाव्यात. याला सयाव वा करंजी म्हणतात.
हे सयाव (करंज्या) धातुवर्धक, शुक्रधातुवर्धक, हृदयाला हितकर असतात. चवीला गोड, पचायला जड, मलप्रवृत्ती साफ करणारे, मोडलेले हाड सांधण्यास मदत करतात. पित्त व वातदोष कमी करतात.
४) अनारसे (शालिपूप) ः
गोडाच्या पदार्थांमध्ये अनारशांचे स्थान वरचे आहे. आपल्या परंपरेत अनारशांचे वाण देण्याची प्रथा आहे. उत्तर हिंदुस्थानातही अनारसे पक्वान्न खास समजले जाते व दिले जाते.
प्रक्षाल्य तण्डुलान् द्विस्त्रिः शोषयित्वा च पेषयेत्‌|
तत्पिष्टं च घृतेनाशु किंचित् चाल्यगुडोदकैः ॥
मर्दयित्वा च वटकान् कृत्वा ते पोस्तबीजकैः|
एकतो घोलयित्वा च तान्घृतेन पचेत्ततः॥

दोन ते तीन वेळा तांदूळ चांगले धुवून वाळवावेत. त्यांचे पीठ करून त्यात थोडेसे तूप. गूळ व पाणी घालून मळावे व त्याचे वडे करून एका बाजूने खसखस लावून तुपात तळावे.

  • अनारसे धातुवर्धन करतात.
  • रुची वाढवितात.
  • गुणांनी स्निग्ध तर वीर्याने थंड असतात.
  • ताकद देणारे असतात.
  • अतिसाराला प्रतिबंध करतात.
    ५) चिरोटे ः
    गोधूमधूमसी चाल्य घृतेनाक्ता जलेन च|
    यित्वा तु तस्याश्‍च ग्राह्य पूगप्रमाणकम् |
    गोलकं वैलयित्वा तु तस्य कुर्याच्च पोलिकाम्
    द्वितीया च तृतीया च कृत्वा स्थाप्यास्तथोपरी ॥
    एकां गृहीत्वा तस्यां तु घृतं दत्वा द्वितीयकाम् |
    तस्याश्‍चोपरी संस्थाय एव स्थाप्या तृतीयका |
    द्वयगुलान् खण्डकान् कृत्वा वेल्लयित्वा घृतेपचेत
    ते घृते पाचिता नाम्ना चिरोटे इति विश्रुताः॥
  • गव्हाच्या रव्याला थोडेसे तूप चोळावे. नंतर पाणी घालून मळून कुटून कुटून मऊ करावा. त्याची सुपारीएवढी गोळी करून कागदासारखी पातळ पोळी लाटावी. अशा तीन पोळ्या कराव्या.
    एका पोळीवर तूप लावून वरून दुसरी पोळी ठेवावी. त्यावर तूप लावून तिसरी पोळी ठेवावी. हे सर्व तीन पदरी वा चार पदरी दुमडून पट्टी तयार करावी. या पट्टीचे पुन्हा तुकडे पाडावेत. ते पुन्हा लाटून पुन्हा दुमडावेत व चौकोनी आकाराचे करून तुपात तळून साखरेबरोबर खावेत.
  • चिरोटे शुक्रवर्धक सांगितले आहे.
  • ताकद वाढवतात.
  • शरीरात शुक्रवर्धन झाले की त्रिदोषांचे आपोआप शमन होते.
  • शुक्रधातु शरीराची ताकद वाढवतो, हृदयाला व मेंदूला पोषक असतो.
  • चिरोटे पचायला थोडे जड असले तरी चिरोटे वातशमन करतात.