म्हापशाच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासाचे साक्षीदार आनंदी निवास

0
168

प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

‘नाट्यालंकार भांडार’ आस्थापन कै. महाबळेश्‍वर मणेरकर यांनी सुरू केले असावे असे वाटते. मराठी नाटके व कोकणी तियात्र यांना पोशाख, पडदे, फ्लॅट्‌स व रंगभूमीला आवश्यक ते इतर सामान पुरविणारे संपूर्ण गोव्यातील हे एक अग्रगण्य आस्थापन होते आणि आजही आहे.

म्हापसा पोलिस स्थानकाच्या मागच्या बाजूने जाणार्‍या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या कै. यशवंत (बाबा) नाईक यांच्या ‘यशवंत निवास’चा कौटुंबिक, सामाजिक, राजकीय तथा सांस्कृतिक इतिहासाचा खजिना खुला करून झाल्यावर जरा पुढे आले की श्री देव विठ्ठल-रखुमाई देवस्थानच्या मागच्या बाजूला जाणार्‍या वळणावर पोचतो. ‘यशवंत निवास’ला लागूनच कै. महादेव व त्यांचे बंधू कै. जयराम भिकाजी नेवगी यांच्या कुटुंबीयांचे पुरातन घर आहे. या जागेत सध्या कै. जयराम यांचे नातू डॉ. पुष्कर श्रीपाद नेवगी व त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञ पत्नी डॉ. पुनम वैद्यकीय सल्ला देतात. त्यापुढेच मग वळणावर मणेरकर कुटुंबीयांचे निवासस्थान आहे. या जागेत त्यांचे जामात श्री. कमलाकांत सिरसाट व त्यांच्या पत्नी सौ. नंदा या आपल्या कुटुंबीयांसहित वास्तव्यास असतात. आज त्या ठिकाणी एकमजली इमारत उभी असून त्यांचा पुत्र ऍड. सुनील कमलाकांत सिरसाट हे कायदा सल्लागार व एक नावाजते वकील म्हणून कार्यरत असतात.
नव्याने बांधलेल्या या इमारतीला जोडूनच कै. महाबळेश्‍वर रघुनाथ मणेरकर यांचा ‘आनंदी निवास’ हा एकमजली जुन्या पद्धतीचा बंगला आहे. कै. महाबळेश्‍वर मणेरकर यांचा सांस्कृतिक व धार्मिक संस्थांशी घनिष्ट संबंध होता.
वास्तविक पाहता म्हापसानगरीचा इतिहास हा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीयदृष्ट्या नव्या पिढीला करून देणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते आणि म्हणूनच या क्षेत्रातील दिग्गजांच्या घराण्याचा इतिहास आजच्या युवा पिढीला सांगून या क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरणा देऊन प्रोत्साहित करावे या सद्हेतूनेच मी हा प्रपंच आरंभला आहे.
मराठी रंगभूमीचा उगम हा गोव्यातून झाला याबद्दल वाद असण्याचं कारण नाही. त्यात म्हापशातील तत्कालीन नाट्यलेखक कै. रघुनाथ सावंत यांनी लिहिलेल्या हस्तलिखितातील एक नाट्यसंहिता उपलब्ध झाल्याने मराठी रंगभूमीची सुरुवात म्हापसानगरीतून सर्वप्रथम झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.
या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी एवढ्यासाठीच केला की, म्हापसानगरीतील कै. महाबळेश्‍वर मणेरकर यांचे ‘नाट्यलंकार भांडार’ व नाटेकर कुटुंबीयांचे ‘नाट्यकलाभूषण भांडार’ या नाट्यलंकार भांडारांबरोबरच दिवकर बंधू, कै. गणेश नार्वेकर आदींची रंगभूमीसाठी लागणारे पडदे, प्लेट्‌स, खुर्च्या, रंगभूषा, ऐतिहासिक व पौराणिक नाटकांसाठी लागणारा पेहराव पुरवणारी प्रसिद्ध आस्थापने होती. कालौघात कै. महाबळेश्‍वर मणेरकर यांचे ‘नाट्यलंकार भांडार’ व नाटेकर कुटुंबीयांचे ‘नाटेकर नाट्यकलाभूषण भांडार’ ही आस्थापने मात्र अजूनही टिकून आहेत.
कै. महाबळेश्‍वर मणेरकर हे आपल्या व्यवसायात प्रामाणिक आणि चोख होते. आज त्यांचे जामात श्री. अवधूत नार्वेकर हे हा व्यवसाय सांभाळतात. पेठेच्या वाड्यावरील अलंकार थिएटर आणि आंगणवाड्यावरील ‘स्वीस चॅपल’ याच्यामधून जाणार्‍या रस्त्याच्या वळणावरील ‘पॉप्युलर फार्मसी’ला लागूनच इ.स. १९३० सालच्या दरम्यान हे ‘नाट्यालंकार भांडार’ आस्थापन कै. महाबळेश्‍वर मणेरकर यांनी सुरू केले असावे असे वाटते. मराठी नाटके व कोकणी तियात्र यांना पोशाख, पडदे, फ्लॅट्‌स व रंगभूमीला आवश्यक ते इतर सामान पुरविणारे संपूर्ण गोव्यातील हे एक अग्रगण्य आस्थापन होते आणि आजही आहे.
माझ्या आईनं बालपणी सांगितलेली एक गोष्ट अजूनही मला आठवते. माझ्या आईचं माहेर फोंडा तालुक्यातील दुर्भाट- तळावली. माझ्या आईला पाच बहिणी होत्या. माझी आई गोरीपान आणि देखणी होती. तिची सर्वात लहान बहीण लिला हीसुद्धा माझ्या आईच्या वळणावर गेली होती. बालपणी ती आमच्या घरी येऊन-जाऊन असायची. त्यावेळी कै. महाबळेश्‍वर मणेरकर हे आपल्या आस्थापनातील कपडे शिवणार्‍या आणि भरजरी पोशाख तयार करणार्‍या शिंप्याला आमच्या घरी पाठवून तिला शोभेल असा पोषाख तयार करून तो नंतर आपल्या नाट्यलंकार भांडारातून भाड्यानं द्यायचे. पुढे मग तिचे सालसेत तालुक्यातील नुवे-वेर्णा येथील प्रभुगावकर कुटुंबात विवाहसंबंध जुळल्यावर तिचे म्हापशाला येणे-जाणे कमी झाले आणि यांना नाटकांसाठी पोषाख तयार करण्यास उपयोगी पडणारी आमची ‘लिला मावशी’ मिळेनाशी झाली.
कै. महाबळेश्‍वर रघुनाथ मणेरकर हे धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते. धोतर, सदरा व त्यावर काळा कोट, डोक्यावर काळी टोपी, पायात वहाणा, डोक्यावर पांढरेशुभ्र केस अशा वेशातील ही व्यक्ती आम्ही वडिलांच्या दुकानावर आलो की येता-जाता दिसायची. त्यांच्या आस्थापनाकडून घरी पोचेपर्यंत वाटेत जी देवतांची मंदिरे मिळत त्या मंदिरांसमोर उभे राहून दोन-तीन वेळा नमस्कार करून समाधान झाल्याशिवाय त्यांचं पाऊल पुढे पडत नसे.
म्हापशातील श्री महारुद्र देवस्थान, श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान, श्री देव बोडगेश्‍वर देवस्थान व त्यांचे कुलदैवत नार्वे येथील श्री कणकेश्‍वरी शांतादुर्गा पंचायतन देवस्थानशी ते संबंधित होते.
त्यांच्या निवासस्थानाजवळील असलेल्या गल्लीत श्री देव विठ्ठल-रखुमाई देवस्थान आहे. या देवस्थानचे ते अनेक वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या देवस्थानच्या मंदिराच्या नूतनीकरणाच्या वेळी मंदिराच्या रस्त्याकडील नक्षीदार सज्जाचे बांधकाम त्यांचे जामात श्री. अवधूत नार्वेकर यांनी करून घेतले आहे. म्हापसानगरीच्या दक्षिण सीमेवरील श्री देव बोडगेश्‍वर देवस्थानची ‘बार्देश नागरिक समिती’ने नियमावली तयार करून, ते देवस्थान सरकारदरबारी नोंदणीकृत केले असता या सार्वजनिक देवस्थानची २४ जानेवारी १९६५ रोजी लोकशाही पद्धतीने पहिली निवडणूक घेण्यात आली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती निवडण्यात आली होती. त्यानंतर इ.स. १९६८ व १९७२ साली झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा देवस्थानच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. याशिवाय त्यांचे कुलदैवत डिचोली तालुक्यातील नार्वे येथील श्री कणकेश्‍वरी शांतादुर्गा पंचायतन देवस्थानचे अध्यक्ष म्हणूनही ते बरीच वर्षे कार्यरत होते. याशिवाय म्हापसानगरीतील श्री मारुती मंदिराच्या गर्भकुडीच्या प्रवेशद्वाराचा रौप्यदरवाजा ‘श्री’चरणी अर्पण केला होता. त्या आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी या रौप्य दरवाजाचा वर्धापनदिन त्यांनी ठेवलेल्या कायम निधीच्या व्याजातून दरवर्षी साजरा केला जातो. गणेशचतुर्थीच्या दिवसांतही त्यांच्या घरी पौराणिक तथा ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखावे केले जायचे व ते देखावे पाहण्यासाठी दर्शक त्यांच्या निवासस्थानी गर्दी करायचे.
त्यांना सौ. आशा ही एकुलती एक मुलगी असल्याने तिच्या विवाहानंतर पती श्री. अवधूत नार्वेकर हे त्यांच्या आस्थापनाचे व्यवहार सांभाळतात. आपली उच्चपदाची शासकीय नोकरी सोडून जन्माने दिवाडी बेटावरील असलेल्या या आमच्या मित्राने म्हापसानगरी हीच आपली कर्मभूमी बनवली आहे. नार्वे येथील श्री कणकेश्‍वरी शांतादुर्गा पंचायतन देवस्थानचे ते तीस वर्षे अध्यक्ष होते आणि त्यांनी आपल्या या कार्यकाळात पंचायतनातील सर्व मंदिरांचे नूतनीकरण करून घेतले होते. याशिवाय दिवाडी येथील श्री देवी सातेरी गणपती पंचायतन देवस्थानचे अध्यक्षपदही बरीच वर्षे भूषवून आपल्या जन्मभूमीशी जोडलेली नाळ तोडू दिली नाही. म्हापशाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव समितीचे ते दोनदा अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. सध्या ‘म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रतिष्ठान’चे प्रमुख विश्‍वस्त म्हणून कार्यरत आहेत. धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांचा वावर आहे. म्हापसा हिंदू ग्रामस्थ सभेचे अध्यक्ष म्हणून ते बारा वर्षे कार्यरत होते आणि आपल्या कारकिर्दीत त्यांनी खासदार निधीतून म्हापसा वैकुंठधाम या दहनभूमीच्या कुंपणाचे राहिलेले बांधकाम पूर्ण करून घेण्याबरोबरच दहनासाठी आलेल्यांना निवार्‍याची आणि बैठकीची सोयही करून घेतली. ‘अखिल गोमंतक वैश्य परिषद’ व ‘म्हापसा वैश्य मंडळ’ या संस्थांचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होतेच, शिवाय म्हापशाची नामवंत शिक्षणसंस्था ‘ज्ञानप्रसारक मंडळ’ या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांचा वावर असतो. पत्नी आशा आणि उच्चशिक्षित कन्या सौ. अपर्णा संझगिरी ही विवाहित ज्येष्ठ कन्या, नातू कु. अथर्व व कु. अमृता ही कनिष्ठ कन्या असं छोटंसं कुटुंब सांभाळत असतानाच बदलत्या काळानुसार आवश्यक ते व्यावसायिक बदल घडवून ते ‘नाट्यलंकार भांडार’ या आस्थापनाचा व्यवहार सांभाळत असतात. आमच्या या सन्मित्राला आणि त्यांच्या कुटुंबीयांना परमेश्‍वरानं समाजसेवेसाठी उदंड आयुरारोग्य प्रदान करावे अशी प्रार्थना करतो.
कै. महाबळेश्‍वर रघुनाथ मणेरकर यांचे पुतणे श्री. रमेश रामकृष्ण मणेरकर यांचाही सामाजिक क्षेत्रात वावर असून तेही म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रतिष्ठानचे एक विश्‍वस्त असून यंदा ते उत्सव समितीचे कोशाध्यक्ष होते. त्यांची सुविद्य पत्नी सौ. चित्रा मणेरकर ही तर गावसवाडा प्रभागातून म्हापसा नगरपालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आली होती. श्री. रमेश मणेरकर व त्यांचे कुटुंबीय हे गावसवाड्यावर वास्तव्यास असतात. ‘नाट्यलंकार भांडार’च्या आस्थापनाच्या व्यवसायातही त्यांचा सहभाग असतो. श्रीमती चित्रा किटलेकर ही ‘ब्रह्मकुमारी’च्या कार्यातही कार्यरत असते.