पाकचे नक्राश्रू

0
220

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेपुढील आपल्या पहिल्याच भाषणात काश्मीर राग आळवला. त्यांच्या भाषणात तब्बल सतरा वेळा काश्मीरचा आणि चौदावेळा भारताचा उल्लेख झाला. काश्मीरमध्ये भारत सरकार कसे अत्याचार करीत आहे याचे रसभरीत वर्णन तर त्यांनी केलेच, शिवाय संयुक्त राष्ट्रसंघाने तेथे आंतरराष्ट्रीय निरीक्षक पाठवावेत अशी मागणीही केली. ‘चोराच्या उलट्या..’ म्हणतात तसाच हा प्रकार आहे. अर्थात, भारताने तेथल्या तेथे त्यांना अत्यंत कडक प्रत्युत्तर दिले आहे. शब्दांचे कोणतेही खेळ न करता अत्यंत स्पष्टपणे पाकिस्तान हे ‘टेररिस्तान’ आहे, त्यात ‘पाक’ म्हणजे पवित्र असे काहीही नाही असे सुनावत भारताने पाकिस्तानला उघडे पाडले. पाकिस्तान जगभरात दहशतवाद्यांची निर्यात करीत आहे, ओसामा बिन लादेनला आणि मुल्ला ओमरला आसरा देणारा हा देश आज स्वतःच दहशतवादाचा बळी असल्याचा बनाव करीत असला तरी दहशतवादाची सदैव पाठराखण करीत आलेल्या या देशाकडून भारताला लोकशाहीचे वा मानवी हक्काचे धडे नको आहेत, असे भारताने सुनावले आहे. यापूर्वी पाकिस्तान ही दहशतवादाची ‘मदरशीप’ असल्याची जी रोखठोक भूमिका भारताने ‘ब्रिक्स’च्या व्यासपीठावर मांडली होती, तिचाच हा पुढचा अध्याय संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर मांडला गेला आहे. पाकिस्तानने काश्मीरसंदर्भात संयुक्त राष्ट्र आमसभेत एवढे अकांडतांडव करण्याचे कारण स्पष्ट आहे. दहशतवादाची पाठराखण करणारा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडत चालला आहे. चीन सोडल्यास कोणताही देश पाकिस्तानवर विश्वास ठेवायला तयार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेने तर पाकिस्तानवरील आपली पाखर काढून घेतल्याचे गेल्या काही महिन्यांतील घटनाक्रमातून स्पष्ट झालेच आहे. अगदी या आमसभेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि अब्बासी यांची धावती भेट झाली तेव्हाही ट्रम्प यांनी त्यांना दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सक्रिय होण्यास फर्मावले अशी वार्ता आहे. भारतात घडवीत आलेल्या दहशतवादासंदर्भात घेरले जात असल्याचे दिसल्याने पाकिस्तानचे नवे पंतप्रधान अब्बासी यांनी काश्मीरवर आक्रमकपणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून अकांडतांडव केले. जेव्हा जेव्हा पाकिस्तान घेरला जातो, तेव्हा काश्मीर राग आळवतो हा इतिहास आहे. यावेळीही वेगळे काही घडलेले नाही. प्रत्येक वेळी भारताचे प्रत्युत्तर संयमित असे, परंतु आता कोणतेही शब्द राखून न ठेवता ठामपणे आणि ठोसपणे पाकिस्तानला उघडे पाडण्याची नीती भारत अवलंबित असल्याचे दिसते. भारताच्या या भूमिकेला पूरक अशा घटना गेल्या काही दिवसांत घडत आहेत. काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्यांना पाकिस्तानकडून पैसा मिळत असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने पुराव्यांनिशी समोर आणले. लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद स्थानबद्धतेत असल्याचे पाकिस्तान सांगत असला तरी तेथील आगामी निवडणुकांमध्ये उतरण्याची घोषणा त्याने केलेली आहे. पाकिस्तानसारख्या अण्वस्त्रसज्ज देशाची सूत्रे हाफीज सईदसारख्या प्रवृत्तीकडे जाणे म्हणजे केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वेळीच ही नांगी ठेचून काढणे जरूरी आहे. कुख्यात भारतीय डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याची आजवर चर्चा असे, परंतु आता खुद्द त्याच्याच भावाने दाऊद पाकिस्तानातच असल्याचे सांगत त्याचे चार – पाच पत्तेही उघड केले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांपासून दहशतवाद्यांपर्यंत सर्वांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानला जगापुढे उघडे पाडण्याची वेळ निश्‍चितच आलेली आहे. पाकिस्तान मात्र आपण दहशतवादाची पाठराखण करीत असल्याचे मान्य करायला तयार नाही. उलट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतच गोळीबार करीत आला आहे, बलुचिस्तानमध्ये भारतच दहशतवाद पसरवीत आहे अशी उलट ओरड त्याने चालवली आहे. शाहिद अब्बासी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानमधील नवे सरकारही नवाज शरीफ यांच्याप्रमाणेच काश्मीरसंबंधीची पाकिस्तानची पारंपरिक भूमिकाच अधिक आक्रमकपणे पुढे रेटणार असल्याचे त्यांच्या या भाषणाने स्पष्ट केले आहे. त्याला भारताने ठोशास ठोसा लगावला आहे. पाकिस्तानचे नक्राश्रू जगापुढे उघडे पाडल्याखेरीज आता प्रत्यवाय उरलेला नाही. हा अग्रलेख लिहून होईस्तोवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे संयुक्त राष्ट्रांपुढील भाषण झालेले नव्हते, परंतु सुषमा स्वराजही आपल्या भाषणात भारताची पाकिस्तानसंदर्भात बदललेली रोखठोक नीतीच पुढे नेतील यात शंका नाही. ही वेळ जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडण्याची आहे. त्यामुळे प्रत्येक हल्ल्यावर असा कडक प्रतिहल्ला चढवूनच पाकिस्तानला राजनैतिक पातळीवर जेरीस आणता येईल.