म्हादई : तिन्ही मुख्यमंत्र्यांना चर्चेद्वारे तोडग्याचा लवादाचा प्रस्ताव

0
88

गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक या तीनही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्रित येऊन पाणी वापराबाबत सुवर्णमध्य काढण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी तीनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत भूमिका घेण्याबाबत कळवण्याचे जललवादाने काल सुनावणीवेळी अतिरिक्त सॉलीसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी, फली नरिमन व नागरगोडकर यांना सूचना दिल्या. पुढील सुनावणी ३ ऑक्टोबरला होणार आहे.

गोव्यातर्फे नाडकर्णी यांनी गोवा बोलणी करण्यास तयार असून याबाबत लवादाच्या सूचना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवणार असल्याचे स्पष्ट केले. कर्नाटक व महाराष्ट्राच्या वकिलांनाही मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती देण्यात येईल, असे स्पष्ट केले. गोव्याच्या साक्षीदारांची उलटतपासणी काल घेण्यात आली. तब्बल ९० प्रश्‍नावरून सविस्तर उत्तरे देताना कर्नाटकाचे सर्व मुद्दे खोडून काढले त्यानंतर आत्माराम नाडकर्णी यांच्या विनंतीवरून जलतज्ज्ञांतर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी १२ सप्टेंबरपर्यंत वेळ मागितली असून गणेश चतुर्थीच्या सणामुळे ७ रोजीच्या सुनावणी यावेळी १२ पर्यंत पुढे घेण्यास मान्यता दिली आहे.
लवादाने गोव्याला इतर सर्व सादरीकरण व पुरावे सादर करण्यासही परवानगी दिली आहे. तशाच प्रकारच्या सूचना कर्नाटकालाही देण्यात आल्या आहेत. गोव्याच्या साक्षीदारांनी काल कर्नाटकाला जेरीस आणताना परदेशी तज्ज्ञ व संशोधकांच्या प्रश्‍नांना नेटकी उत्तरे दिली व अचंबित केले.