दीनदयाळ आरोग्य विमा योजनेच्या अंमलबजावणीस प्रारंभ

0
100

दीनदयाळ आरोग्य विमा योजनेमुळे सरकारी व खासगी इस्पितळे यांच्यात रुग्णांना उपचार देण्याच्या बाबतीत स्पर्धा निर्माण होणार असून त्यामुळे उपचार सेवेचा दर्जा सुधारण्यास मदतच होणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल सांगितले. दीनदयाळ आरोग्य विमा योजनेच्या अंमलबजावणीचा शुभारंभ कालपासून झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पार्सेकर बोलत होते.

या योजनेसाठीच्या यादीत समावेश करण्यात आलेल्या १९ खाजगी इस्पितळांच्या प्रतिनिधींना यावेळी मुख्यमंत्री पार्सेकर व उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते त्यासाठीची पत्रे देण्यात आली. जनतेसाठी अशा प्रकारची आरोग्य विमा योजना सुरू केलेले गोवा हे देशातील पहिलेच राज्य ठरले असल्याचे पार्सेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या ४४७ प्रकारच्या आजारांसाठी ही विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. मात्र, भविष्यात आणखी आजारही या योजनेखाली आणले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सध्या राज्याबाहेरील तीन इस्पितळांना या योजनेखाली आणले आहे. मात्र, लवकरच टाटा मेमोरिएल कॅन्सर हॉस्पिटलासह अन्य काही इस्पितळांनाही या योजनेखाली आणले जाईल, अशी माहितीही पार्सेकर यांनी यावेळी दिली. ही योजना लागू करण्यापूर्वी कित्येक बैठका घेण्यात आल्या. योजनेत त्रुटी राहू नयेत यासाठी भरपूर अभ्यास करण्यात आला.