म्हादईप्रश्‍नी आज मंत्रिमंडळाची बैठक

0
12

>> तिन्ही खासदार तसेच आमदारांसोबत मुख्यमंत्री घेणार बैठक

>> सरकारी सचिव व अधिकारीही उपस्थित राहणार

म्हादईप्रश्‍नी आज सोमवार दि. २ जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या एका विशेष बैठकीबरोबरच इतर अनेक बैठकांचेही आयोजन होणार असल्याची माहिती काल राज्य सरकार तसेच भाजपमधील सूत्रांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज एकाच दिवशी अनेक बैठका घेऊन म्हादईप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी चर्चा करणार आहेत. आज ते सर्व सरकारी खात्यांच्या सचिवांची तसेच खाते प्रमुखांची एक बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन तसेच राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर ह्या गोव्याच्या तिन्ही खासदारांचीही एक बैठक घेणार आहेत. तद्नंतर मुख्यमंत्री राज्याच्या चाळीसही आमदारांचीही एक बैठक घेणार आहेत.
त्याशिवाय आज भाजपच्या गाभा समितीचीही एक बैठक होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे म्हादईप्रश्‍नी कित्येक बैठका घेऊन या प्रश्‍नावर वरील सर्व घटकांशी सविस्तर चर्चा करून पुढील कृती ठरवणार असल्याचे काल सूत्रांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षांचे आमदार, राज्यातील पर्यावरणवादी तसेच विविध बिगर सरकारी संघटना व राज्यातील जागरूक नागरिक यानी म्हादईप्रश्‍नी उठवलेल्या जोरदार आवाजामुळे राज्यातील प्रमोद सावंत यांचे सरकार दबावाखाली आले असून त्या पार्श्‍वभूमीवर आज राज्यात मॅरेथॉन अशा बैठकांचे सत्र होऊ घातले आहे. वाढत्या दबावामुळे विरोधकांनाही या प्रश्‍नावरील चर्चेत सामावून घेण्याचा निर्णय सावंत सरकारने घेतला आहे.

त्वरित पावले उचलण्याची मागणी
उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन या लोकसभेच्या दोन्ही खासदारांनी म्हादईप्रश्‍नी राज्य सरकारने केंद्र दरबारी एक शिष्टमंडळ नेऊन त्यांच्यासमोर गोव्याची बाजू मांडावी अशी यापूर्वीच मागणी केलेली आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनीही याच प्रकारची मागणी केलेली असून आज आदमी पक्ष, रेव्हुलेशनरी गोवन्स पक्षाचे तसेच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसनेही गोवा सरकारने याबाबत तातडीने कडक पावले उचलत पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडे विनाविलंब गोव्याची बाजू मांडावी, अशी भूमिका घेतली आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यानीही शनिवारी दै. नवप्रभाशी बोलताना म्हादईचा प्रश्‍न हा गोव्याच्या जीवन मरणाचा प्रश्‍न असून याबाबत राज्य सरकारने विनाविलंब ठोस अशी पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते.

तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे नेते ट्रॉजन डिमेलो यांनीही म्हादईप्रश्‍नी चिंता व्यक्त केलेली असून राज्य सरकारने विनाविलंब केंद्रीय दरबारी गोव्याची भूमिका मांडावी अशी मागणी एका व्हिडिओ संदेशाद्वारे केली आहे.

म्हादई प्रश्‍नामुळे काल नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकार कधी नव्हे एवढे दबावाखाली आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज राज्यात सदर प्रश्‍नी एका मागोमाग एक अशा बैठका होऊ घातल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, राज्य सरकार कर्नाटकच्या म्हादई नदीवरील प्रकल्पासाठीच्या सुधारित तपशीलवार प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) दिलेली मान्यता मागे घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्याकडे विनंती करणार असल्याचे यापूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. कर्नाटकने म्हादई खोर्‍यात पाणी वळविण्यासाठी केलेले अवैध कामाबाबत या प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले असून म्हादईप्रश्‍नी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज तातडीच्या बैठकांचे आयोजन केले आहे.