गोवा लोकसेवा आयोगाची कर्मचारी भरती प्रक्रिया आता एकाचवेळी

0
20

>> सरकारकडून प्रस्तावाला मान्यता

राज्य सरकारने गोवा लोकसेवा आयोगाच्या गोवा नागरी सेवा, गोवा पोलीस सेवा आणि गोवा वनसेवेसाठी कर्मचारी भरतीसाठी एकच सामान्य परीक्षा घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सरकारच्या तीनही विभागातील पदासाठीची भरती प्रक्रिया एकाच वेळी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे परीक्षेवर होणारा खर्च आणि वेळ वाचणार आहे.

गोवा लोकसेवा आयोगाकडून नागरी, पोलीस आणि वन या तीनही विभागातील नोकरभरतीसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जात आहेत. आता, आयोगाकडून वर्षातून एकाच वेळी सामान्य परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक आगाऊ जाहीर केले जाणार आहे.

सरकारच्या तीनही विभागातील पदाच्या नोकरभरतीच्या वेळी एखाद्या उमेदवाराला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागत आहेत. राज्य सरकारने एकच सामान्य परीक्षा घेण्याचा प्रस्तावाला मान्यता दिल्याने उमेदवाराला वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज भासणार नाही. या आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार त्यांच्या आवडीनुसार सरकारी विभागातील नागरी, पोलीस किंवा वन विभागात नोकरीचा पर्याय निवडू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गोवा लोकसेवा आयोगाकडून सामान्य परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात प्रि-स्क्रीनिंग परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर स्क्रीनिंग परीक्षा घेतली जाणार आहे. यात इतिहास, भूगोल, इंग्रजी, कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, राज्यशास्त्र आदी विषयाचा समावेश असणार आहे. त्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

लेखी परीक्षेमध्ये चार प्रश्‍नपत्रिका सोडवाव्या लागणार आहेत. सर्वांत शेवटी टप्प्यात उमेदवारांच्या मुलाखत घेतली जाणार आहेत. त्यानंतर उमेदवाराला सरकारी सेवेसाठी पर्याय निवड करण्याची सूचना केली जाणार आहे. आयोगाकडून यशस्वी उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाणार असून सरकारच्या गरजेनुसार पदाची भरतीसाठी शिफारस केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.